bank of maharashtra

माळी समाजातील सर्व पोटजातींनी माळी म्हणूनच एकसंघ राहायला हवं – भुजबळ

0

नाशिक : ओबीसीमध्ये माळी समाज हा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे ओबीसींच्या प्रश्नांवर आपण नेहमीच जागरूक राहून काम केलं पाहिजे. इतर समाज बांधवांना सोबत घेऊन आपण पुढे जायला हवे. त्यातून महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. तसेच माळी समाजातील सर्व पोटजातींनी माळी म्हणूनच एकसंघ राहायला हवं असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

श्री. क्षत्रिय काशीमाळी समाज उन्नती मंडळ नाशिक या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने आज काशीमाळी मंगल कार्यालय येथे भव्य सत्कार समारंभ सोहळा पार पडला. या आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार प्रा.देवयानी फरांदे, सुरेश खोडे,बाजीराव तिडके, शंकरराव काठे,राकाशेठ माळी, चंद्रकांत खोडे, भास्करराव काठे, छगन भंदुरे, विजय राऊत, तेजश्री काठे,मोहन माळी यांच्यासह समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेली ५० वर्ष सामाजिक कार्यात श्री. क्षत्रिय काशीमाळी समाज उन्नती मंडळ काम करत आहे. महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर हे मंडळ अविरत काम करत आहे. संस्थेच्या या प्रवासात अनेक अडचणी देखील आल्या. मात्र समाज बांधवांनी एकत्र येऊन त्यावर मात करत आपल काम सुरू ठेवलं. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे.

ते म्हणाले की, माळी समाज ही समाजरचनेतील एक अत्यंत महत्वाची आणि श्रमशील घटक आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास, हा समाज परंपरेने शेती, फुलशेती, बागायती, आणि भाजीपाला उत्पादन यामध्ये पारंगत होता. “मातीशी नातं” असलेल्या या समाजाने आपल्या हातात कुदळ, फावडे, आणि मेहनतीचा मंत्र घेऊन पिढ्यानपिढ्या देशाची पोटं भरली. मात्र, केवळ पारंपरिक व्यवसायातच गुंतून न राहता या समाजाने आधुनिक काळाशी सुसंगत परिवर्तन देखील स्वीकारले आहे.

आज शिक्षण, व्यवसाय, सरकारी सेवा, उद्योग, राजकारण, सामाजिक चळवळी अशा अनेक क्षेत्रांमध्ये माळी समाजाच्या अनेक व्यक्तींनी आपली ओळख निर्माण केली आहे. माळी समाजात फूल माळी, हळदी माळी, जिरे माळी, काशी माळी, काच माळी, लिंगायत माळी, फुले माळी, कडू, बावने, अधप्रभू, अधशेटी, वनमाळी, पाच कळशी, चौकळशी, क्षत्रिय माळी अशा माळी समाजात अनेक पोट जाती आहे. मात्र आपण सर्वांनी माळी म्हणून एकत्र राहिले पहिले, एकसंघ राहिले पाहिजे.

ते म्हणाले की, माळी समाज हा देशभरात पसरलेला असून हा देशातील एक निर्णायक असा समाज आहे. ओबीसी घटकांना सोबत घेऊन जाण्याची ताकद या समाजात आहे. त्यामुळे ओबीसींच्या प्रश्नावर काम करताना ओबीसी समाजातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन लढा द्यायला हवा. तरच आपण आपले प्रश्न सोडवू शकतो. कुठल्याही समाजाला कमी लेखून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ओबीसी समाज घटकांनी अतिशय महत्वपूर्ण काम केलं असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद याबाबत मागणी करत होती. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या कार्यकाळात केंद्रात १०० हून अधिक ओबीसी खासदारांचे संघटन करण्यात येऊन मागणी केली. तसेच न्यायालयात देखील आपली ही लढाई सुरू होती. गेल्या काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले होते. याबाबत न्यायालयीन लढाई आपण लढलो. नुकतेच हे आरक्षण पूर्ववत करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे आपण आभारी आहोत असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

समाज विभूषण, समाज भूषण, समाज रत्न, जीवन गौरव पुरस्काराने सन्मानसमाज विभूषण पुरस्काराने शंकरराव काठे, बाजीराव तिडके, समाजरत्न पुरस्काराने सुरेशदादा खोडे, जीवनगौरव पुरस्काराने राजाराम काठे, समाज भूषण पुरस्काराने डॉ.नरेश विधाते, रामदास मौले, नारायण मौले, सुरेश भंदुरे , शिवाजी भंदुरे, चुनीलाल नळे, बाबुराव वाघ, सुभाष तिडके, नारायण वाघ, मधुकर काशमिरे, भिकाजी उगले, सोमनाथ गवळी, ॲड.दत्तोपंत काशमिरे, चंद्रकांत खोडे, चंद्रकांत वाघ, ह.भ.प पूजा वाघ, ज्ञानदेव बनकर यांचा सन्मान करण्यात आला.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech