bank of maharashtra

उत्तर भारतात धुक्याचे सावट; सरकार, विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी जारी केला सल्ला

0

नवी दिल्ली : उत्तर भारतात शुक्रवारी सकाळी तीव्र थंडीबरोबरच दाट धुके पसरले असून, त्यामुळे दृश्यता अत्यंत कमी झाली आहे. याचा परिणाम विमानसेवांवर झाला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले आहे की धुके आणि धुरकट वातावरणामुळे देशभरातील विमानसेवा प्रभावित होऊ शकतात. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी आपल्या संबंधित एअरलाइन्सच्या संपर्कात राहावे आणि उड्डाणासंबंधी अद्ययावत माहिती घेत राहावी. तसेच विमानसेवांमध्ये अतिरिक्त वेळ लागू शकतो.”

इंडिगो एअरलाइन्सनेही यासंदर्भात सल्ला (अ‍ॅडव्हायझरी) जारी केली असून, धुक्यामुळे उत्तर भारतातील विमानसेवा प्रभावित होऊ शकतात, असे नमूद केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये इंडिगोने म्हटले आहे, “दिल्ली आणि उत्तर भारतात सकाळी धुक्यामुळे दृश्यता कमी आहे, त्यामुळे विमानसेवा प्रभावित होऊ शकतात. ही परिस्थिती हिवाळ्यात नेहमी उद्भवते, त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत विमानसेवा चालवण्यात येतील. सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे विमानतळाकडे निघण्यापूर्वी आपल्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात येतो.”

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कमी दृश्यतेमुळे सध्या CAT-III (कॅट-3) श्रेणी अंतर्गत विमानसेवा सुरू आहेत. या श्रेणीमध्ये विमान उड्डाण आणि लँडिंगसाठी वैमानिकांना विशेष प्रशिक्षण आवश्यक असते, कारण अत्यल्प दृश्यतेत उड्डाण करावे लागते. यासाठी अत्याधुनिक उपकरणांचाही वापर केला जातो.दिल्ली विमानतळ प्रशासनाने दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, धुक्यामुळे विमानसेवा प्रभावित झाल्या असून सध्या कॅट-3 स्थितीतच संचालन सुरू आहे. जमिनीवरील (ऑन-ग्राउंड) पथके समन्वय साधून कार्यरत आहेत.

दरम्यान, एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम फॉर दिल्लीनुसार शुक्रवारी सकाळी राजधानी दिल्लीचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३८७ नोंदवण्यात आला आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) च्या सकाळी सात वाजताच्या आकडेवारीनुसार, अलीपूर: AQI ३०६, आनंद विहार: AQI ४४२,अशोक विहार: AQI ३९२, आया नगर: AQI ३९७,बवाना: AQI ३८४, बुराडी: AQI ३१३, चांदणी चौक परिसर: AQI ३९० नोंदवण्यात आला आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech