विशाखापट्टणम : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय १७१ हे विमान १२ जून रोजी उड्डाणानंतर अवघ्या ३२ सेकंदातच कोसळले होते. या दुर्दैवी घटनेत २७० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ज्यामध्ये विमानातील २४१ आणि इतर २९ जणांचा समावेश होता. आता या दुर्घटनेचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. जो केवळ धक्कादायकच नाही, तर भारताच्या विमान वाहतूक व्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करतो.
हा अहवाल विमान अपघात तपास ब्युरोने तयार केला आहे. यावर नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी विशाखापट्टणममध्ये सांगितले की, मला वाटत नाही की, आपण सध्या यावर कोणताही निष्कर्ष काढावा. माझा असा विश्वास आहे की, आपल्याकडे जगातील सर्वोत्तम वैमानिक आणि क्रू वर्कफोर्स आहे. देशातील वैमानिक आणि क्रूच्या सर्व प्रयत्नांचे मी कौतुक करतो. ते नागरी विमान वाहतुकीचे प्राथमिक संसाधन आहेत. आम्ही वैमानिकांच्या कल्याणाची काळजी घेतो. म्हणून आपण सध्या कोणताही निष्कर्ष काढू नये आणि अंतिम अहवाल येईपर्यंत वाट पाहिला हवी.