नवी दिल्ली : कर्करोगाला समजून घेण्याच्या आणि त्यावर उपचार करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन करता येवू शकेल, अशी कृत्रिम प्रज्ञेची चौकट एका नव्या अभ्यासातून सादर करण्यात आली आहे. केवळ पेशींच्या आकाराने किंवा प्रसाराने नव्हे तर त्याच्या अणूंच्या बांधणी वरून- ही चौकट आपल्याला कर्करोगाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टीकोन प्रदान करेल. कर्करोग हा केवळ अनिर्बंध वाढणाऱ्या पेशींचा आजार नाही – तो कर्करोगाच्या हॉलमार्क्स नावाच्या न दिसून येणाऱ्या जैविक क्रियांच्या लक्षणांवरूनही दिसून येतो. निरोगी पेशी घातक कशा बनतात: त्या कशा पसरत जातात, रोगप्रतिकारक शक्ती कशी क्षीण करत जातात आणि उपचारांना कसा विरोध करतात,हे या हॉलमार्क्स वरुन स्पष्ट होते. अनेक दशकांपासून, वैद्यकीय तज्ञ ‘टीएनएम’ (सुरूवात,वाढ आणि इतर भागात प्रसार) सारख्या स्टेजिंग सिस्टमवर अवलंबून असत, जे ट्यूमरचा आकार आणि प्रसाराचे वर्णन करतात. परंतु अशा सिस्टम्स मधून बहुतेकदा पेशींच्या गहन अणूस्तरावरील बांधणीविषयक माहिती मिळत नसे -म्हणूनच कर्करोगाच्या “समान” टप्प्यांवर असणाऱ्या दोन रुग्णांमध्ये परिणाम खूप वेगळे का असू शकतात,यांचे कारण स्पष्ट होत नसे.
अशोका विद्यापीठासोबत सहकार्य करणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (DST) स्वायत्त संस्था एस एन बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस यातील शास्त्रज्ञांनी कर्करोगाची आण्विक स्तरावरील बांधणी (म्हणजेच “माईंड”) वाचू शकणारी आणि त्याच्या वर्तनाचा अंदाज लावणारी पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता चौकट सादर केली आहे. डॉ. शुभाशिष हलदर आणि डॉ. देबायन गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १४ प्रकारच्या कर्करोगांमधील ३.१ दशलक्ष एकल पेशींचे विश्लेषण ऑन्कोमार्क नावाच्या एका चाचणीद्वारे केले, ज्यामुळे हॉलमार्क-चालित ट्यूमर स्थिती दर्शविणारे कृत्रिम “स्यूडो-बायोप्सी” संच तयार झाले. या प्रचंड डेटासेटमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) ट्यूमरच्या वाढीस आणि उपचारपध्दतींच्या प्रतिरोधाला चालना देण्यारा कर्करोगाचा इतर भागांतील प्रसार (मेटास्टॅसिस) रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि जीनोमिक अस्थिरता यासारख्या बाबी एकत्र कसे कार्य करतात हे शिकता आले.
ऑन्कोमार्क अंतर्गत चाचणी ९९% पेक्षा जास्त वेळा अचूक ठरली आणि पाच स्वतंत्र गटांमध्ये ती ९६% पेक्षा जास्त वेळा अचूक ठरली. आठ प्रमुख डेटासेटमधून २०,००० प्रत्यक्ष रुग्णांच्या नमुन्यांवरुन हे प्रमाणित करण्यात आले, जे त्यांची व्यापक उपयुक्तता निश्चित करते. कर्करोगाची वाढ होत असतानाचे टप्पे, या हॉलमार्कद्वारे शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच प्रत्यक्षात पाहता आले. कम्युनिकेशन्स बायोलॉजी (नेचर पब्लिशिंग ग्रुप) या पत्रिकेत प्रकाशित झालेल्या नवीन फ्रेमवर्क आराखड्यामुळे रुग्णाच्या ट्यूमरमध्ये कोणते हॉलमार्क सक्रिय आहेत हे स्पष्ट होऊ शकते, ज्यामुळे डॉक्टर त्या प्रक्रियांना थेट लक्ष्य करणारी औषधायोजना करु शकतील. मानकांप्रमाणे सुरुवातीला कमी हानिकारक असलेले कर्करोग, जे पुढे जलदगतीने वाढू शकतात अशा कर्करोगांची चिकित्सा करण्यास देखील या चाचण्या मदत करू शकतात, ज्यासाठी लवकर हस्तक्षेप करणे शक्य होईल.
