मुंबई : शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत मोठी घोषणा केली. ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला तातडीने बरखास्त केले जाईल, तसेच संबंधित विश्वस्तांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले आणि पुढे त्यांनी सांगितलं देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.
नेवासा (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील या प्रसिद्ध शनि मंदिरातील घोटाळ्यांबाबत लक्षवेधी सूचना स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी सभागृहात मांडली. ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप्स तयार करून लाखो भक्तांकडून पूजेसाठी देणग्या उकळल्या. प्रत्येक ॲपवर ३-४ लाख भक्तांनी पैसे पाठवले होते, असा आरोप लंघे यांनी केला. एकूण घोटाळ्याचा आकडा १०० कोटींचा असून भाजप आमदार सुरेश धस यांनी हा घोटाळा ५०० कोटी रुपयांपर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ट्रस्टच्या व्यवहारांची चौकशी केलेल्या समितीच्या अहवालात अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. बनावट ॲपच्या माध्यमातून भक्तांकडून घेतलेल्या देणग्या विश्वस्तांच्या कार्यकर्त्यांच्या नावे असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सायबर सेलमार्फत केली जाणार असून, या घोटाळ्यांमध्ये जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे, २५८ कर्मचाऱ्यांवर चालणाऱ्या या देवस्थानमध्ये विश्वस्तांनी तब्बल २,४४७ कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे समोर आले. मात्र, चौकशीत प्रत्यक्षात एवढे कर्मचारी अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर व शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या धर्तीवर शनिशिंगणापूर मंदिरासाठी शासकीय समिती स्थापन करण्यात येणार असून त्यासाठीचा कायदा आधीच तयार असून लवकरच अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे यापुढे मंदिर व्यवस्थापनावर शासकीय नियंत्रण राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच, या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, बाह्य अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिले.