तिरुअनंतपुरम : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान एक मोठा अपघात टळला आहे. केरळच्या पट्टनामथिट्टा जिल्ह्यातील प्रमादम स्टेडियममध्ये राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरने लँडिंग केल्यानंतर हेलिपॅडचा काही भाग अचानक जमिनीत खचल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही आणि राष्ट्रपती सुरक्षित आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या चार दिवसांच्या केरळ दौऱ्यावर असून, त्या २१ ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरम येथे दाखल झाल्या होत्या. आज त्यांचा सबरीमला येथील भगवान अयप्पा मंदिरात दर्शन व आरतीसाठी जाण्याचा कार्यक्रम होता. या निमित्ताने त्या पट्टनामथिट्टा जिल्ह्यातील प्रमादम स्टेडियमवर हेलिकॉप्टरने आल्या होत्या. लँडिंग झाल्यानंतर काही क्षणांतच हेलिपॅडचा एक भाग जमिनीत खचला आणि हेलिकॉप्टरचा मागील भाग जमिनीत थोडासा अडकला. अचानक झालेल्या या घटनेमुळे उपस्थित सुरक्षारक्षक, पोलीस व अधिकाऱ्यांमध्ये काही वेळ गोंधळ उडाला.
हेलिपॅड खचल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार, वायूसेनेच्या हेलिकॉप्टरच्या वजनामुळे तो भाग खाली बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत राष्ट्रपती मुर्मू, त्यांच्यासोबत असलेले अधिकारी किंवा पायलट दलातील कोणालाही दुखापत झाली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ सर्व कर्मचारी घटनास्थळी धावले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
घटनेनंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तत्काळ सक्रिय झाले. त्यांनी हेलिकॉप्टरला खचलेल्या भागातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि काही मिनिटांतच हेलिकॉप्टर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये जवान आणि कर्मचारी मिळून हेलिकॉप्टरला ढकलत ते सुरक्षित जागी नेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या अपघातामुळे राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या कार्यक्रमात काही वेळासाठी अडथळा निर्माण झाला असला तरी नंतर सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले. स्थानिक प्रशासन आणि वायूसेनेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने तपास सुरू केला असून हेलिपॅड खचण्याचे नेमके कारण शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.