कोल्हापूर : गणेशोत्सवाचे आनंदमय वातावरण सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात हृदयद्रावक घटना घडली. श्रावण गावडे या दहा वर्षीय मुलाचा खेळता खेळता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी अंत झाला. श्रावण गावडे हा मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात खेळत होता. श्रावणला अचानक अस्वस्थ वाटू लागले. खेळ सोडून तो घरी गेला आणि आईच्या कुशीत कोसळला. आईच्या मांडीवर डोके टेकवत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणात त्याने प्राण सोडले.
अवघ्या १० वर्षे वय असताना हृदय विकाराचा जोरदार धक्का येण्याची दुर्मीळ घटना घडली. यामुळे कोडोली गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत हृदयरोग तज्ज्ञ म्हणाले की, या वयाचे जे पेशंट असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी जेनेटिक आरोग्य समस्या असतात. किंवा हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये प्रॉब्लेम होऊन अशा समस्या होतात. एकाएकी काही त्रास झाल्यास, ताणतणाव असेल किंवा एकाएकी धावपळ केल्यानंतर हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होऊन असे अटॅक येऊ शकतात. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या दोन मुख्य रक्तवाहिनींमधील एखाद्या रक्त वाहिनीत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे हार्टअटॅक येऊ शकतात आणि पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होतो.
हा धोका एकदम लक्षात आलेला नसतो, जेव्हा आपण स्क्रीनिंग करतो किंवा काही कारणामुळे पेशंटला थाप वगैरे लागली तर त्यानंतर चाचण्या केल्या जातात. मात्र सर्वसाधारणपणे नियमित अशा चाचण्या होत नाहीत आणि त्यामुळे असे धोके निर्माण होतात. अनेकदा आपण पाहिलं आहे की मॅरेथॉनसारख्या रनिंग करुन आलेला धावपटू अचानक एकाएकी हृदयविकाराचा धक्का येऊन मृत्यू होतो, असे त्यांनी म्हटले आहे.