नवी दिल्ली : अमेरिकेच्या बॉर्डर पेट्रोल पोलिसांनी बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या ३० भारतीय नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले हे लोक अमेरिकेत कमर्शियल ड्रायव्हर लायसन्सच्या आधारे ट्रक चालवत होते. बॉर्डर पेट्रोलने एका विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली आहे. यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) विभागाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, बॉर्डर पेट्रोल एजंट्सनी कॅलिफोर्नियातील एल सेंट्रो सेक्टरमध्ये एकूण ४९ बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींकडे कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स आढळून आले. स्थलांतर तपासणी चौक्यांवर तपासणीदरम्यान ही कारवाई करण्यात आली, असे कस्टम विभागाने स्पष्ट केले आहे.
कस्टम विभागाच्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान चालवण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण ४२ बेकायदेशीर स्थलांतरित पकडण्यात आले, जे कमर्शियल ड्रायव्हर लायसन्सवर ट्रक चालवत होते. यापैकी ३० जण भारतीय नागरिक आहेत. उर्वरितांमध्ये दोन जण अल साल्वाडोरचे असून इतर चीन, एरिट्रिया, हैती, होंडुरास, मेक्सिको, रशिया, सोमालिया, तुर्की आणि युक्रेन येथील नागरिक आहेत.
एजन्सीने सांगितले की, अटक करण्यात आलेल्या ३१ जणांना कॅलिफोर्निया राज्य सरकारने कमर्शियल ड्रायव्हर लायसन्स जारी केले होते. उर्वरित आठ लायसन्स फ्लोरिडा, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, मेरीलँड, मिनेसोटा, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया आणि वॉशिंग्टन या राज्यांनी जारी केले होते.ट्रक चालकांविरोधातील ही कारवाई अनेक प्राणघातक अपघातांनंतर करण्यात आली आहे. या अपघातांमध्ये बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या व्यक्तींनी वाहन चालवताना गंभीर अपघात घडवून आणले असून, त्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.
कस्टम विभागाने सांगितले की, या मोहिमेचा उद्देश स्थलांतर कायद्यांची अंमलबजावणी करणे, अमेरिकेचे महामार्ग सुरक्षित ठेवणे आणि व्यावसायिक वाहतूक क्षेत्रातील नियामक मानके कायम राखणे हा आहे. अधिकाऱ्यांनी नमूद केले की, “अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना कधीही हे ट्रक चालवण्याची परवानगी नसावी. ज्या राज्यांनी त्यांना कमर्शियल ड्रायव्हर लायसन्स दिले, ती राज्ये अलीकडे घडलेल्या दुर्दैवी आणि प्राणघातक अपघातांसाठी थेट जबाबदार आहेत. होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन आणि इतर संबंधित एजन्सींमधील आमच्या सहकारी भागीदारांसोबत मिळून, एल सेंट्रो सेक्टर अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राहील.”
