bank of maharashtra

छत्तीसगडमध्ये १७० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

0

गेल्या तासांत एकूण २५८ नक्षलवादी झाले शरण

नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी लढ्याला मोठे यश मिळाले असून, आज, गुरुवारी एकाच दिवशी तब्बल १७० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या घटनेने नक्षलवादविरोधातील केंद्र सरकारच्या धोरणांची परिणामकारकता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. देशात मागील चोवीस तासांत छत्तीसगडमधील २७ आणि महाराष्ट्रातील ६१ नक्षलवाद्यांनीही शस्त्र टाकली असून, २५८ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडत मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना या यशाचे श्रेय सुरक्षाबळांच्या शौर्याला आणि केंद्र व राज्य सरकारांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांना दिले. शहा यांनी ट्विटरवर लिहिले की,

आजचा दिवस नक्षलविरोधी लढ्यात ऐतिहासिक ठरला आहे. मागील दोन दिवसांत २५८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत संविधानावर विश्वास दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या कठोर धोरणांमुळे नक्षलवाद आता अंतिम टप्प्यात आहे. शहा यांनी स्पष्ट केले की,जोपर्यंत कोणी शस्त्र उचलतो, तोवर त्याला सुरक्षाबळांचा सामना करावा लागेल. पण जो कोणी आत्मसमर्पण करतो, त्याचे सरकार स्वागत करेल. आगामी ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना पुनर्वसन धोरणांतर्गत मदत दिली जाणार असून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष कार्यक्रम आखले जाणार आहेत, असेही गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

छत्तीसगडमध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर, २१०० पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, १७८५ जणांना अटक करण्यात आली आहे आणि ४७७ नक्षलवादी चकमकीत ठार झाले आहेत. हे आकडे नक्षलवादविरोधातील सरकारच्या दृढ इच्छाशक्तीचे द्योतक मानले जात आहेत. सध्या नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या फक्त तीनवर आली असून, बीजापूर, सुकमा आणि नारायणपूर हेच जिल्हे उर्वरित संघर्षाचा केंद्रबिंदू आहेत. गृह मंत्रालयाने यास नक्षलमुक्त भारताच्या दिशेने मोठे पाऊल मानले आहे.नक्षलविरोधी अभियानात मिळालेल्या या यशामुळे संपूर्ण देशात राष्ट्रीय एकात्मता, विकास व शांततेच्या दिशेने नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech