bank of maharashtra

पंतप्रधान मोदींवरील टिप्पणीवरून अमेरिकन गायिकेने राहुल गांधींना फटकारले

0

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच म्हणाले होते कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्पपासून घाबरतात आणि वारंवार उपेक्षा होऊनही त्यांचे अभिनंदन करत राहतात. यावर आता अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी राहुल गांधी यांना चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून घाबरत नाहीत. मोदी दीर्घकालीन विचार आणि रणनीती समजून घेणारे नेते आहेत. मेरी मिलबेन यांनी ‘एक्स’वर लिहिलं कि, “तुमचं म्हणणं चुकीचं आहे, राहुल गांधी. पंतप्रधान मोदी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून घाबरत नाहीत. मोदी यांना दीर्घकालीन धोरणांची समज आहे आणि अमेरिका व भारत यांच्यातील कूटनीतीचे ते उत्तम नेतृत्व करत आहेत. जसं ट्रम्प नेहमी अमेरिकेच्या हितासाठी निर्णय घेतात, तसंच मोदीही भारताच्या फायद्यासाठी निर्णय घेत आहेत. मी याचं स्वागत करते. राष्ट्रप्रमुख हेच करतात – जे त्यांच्या देशासाठी योग्य आहे.”

मेरी मिलबेन पुढे म्हणाल्या, “तुमच्याकडून अशा प्रकारच्या नेतृत्वाच्या समजुतीची अपेक्षा नाही, कारण तुम्ही भारताचे पंतप्रधान होण्याची अर्हता किंवा तीव्र बुद्धिमत्ता गाठलेली नाही. तुम्ही ‘आय हेट इंडिया’ टूरवर गेला आहात, ज्याचे एकमेव प्रेक्षक तुम्ही स्वतः आहात. त्यामुळे चांगलं होईल की तुम्ही परत याल.” दरम्यान, राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींवर आरोप करताना म्हणलं होत कि, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्याकडून उपेक्षा होऊनही त्यांना वारंवार अभिनंदन संदेश पाठवत असतात. भारताने रशियन तेल खरेदी करणार नाही हे ठरवण्याची आणि जाहीर करण्याची संधी ट्रम्प यांना दिली गेली. वित्तमंत्र्यांची अमेरिका भेट रद्द करण्यात आली. गाझा शांती करारातून शरम अल शेखमध्ये माघार घेण्यात आली. ऑपरेशन सिंदूरवरील ट्रम्प यांच्या विधानाला मोदी सरकारने विरोध केला नाही. असे पाच मुद्दे त्यांनी मांडले होते.

मेरी मिलबेन या अमेरिकन पॉप गायिका आहेत. २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले असताना, एका खास कार्यक्रमात मेरी मिलबेन यांनी मोदींच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले होते. त्याआधी त्यांनी ‘जन गण मन’ भारताचा राष्ट्रगीत गायले होते आणि मोदींच्या अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक आहे आणि त्या अनेक वेळा त्यांची स्तुती करताना दिसल्या आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech