bank of maharashtra

इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका

0

वॉशिंग्टन : इराणमधील अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. तसेच अमेरिकेने उचललेल्या या पावलावर अनेक देशांकडून टीका होत आहे.या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बोलावण्यात आलेल्या आपातकालीन बैठकीमध्येही याचे पडसाद उमटले. तसेच यामध्ये रशिया, चीन आणि पाकिस्तानने १५ सदस्यीय परिषदेमध्ये एक मसुदा सादर करून, पश्चिम आशियामध्ये तातडीने युद्धविराम घोषित करण्याची मागणी केली. अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा रशिया आणि चीनने तीव्र शब्दात निषेध केला आहे. चीनचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत फू कोंग म्हणाले की, पश्चिम आशियामध्ये बळजबरीने शांतता प्रस्थापित करता येणार नाही.

सद्यस्थितीत संवाद आणि चर्चेच्या माध्यमातूनच यावर तोडगा निघू शकतो. इराणच्या आण्विक प्रश्नावर मुत्सद्देगिरीचा मार्ग अद्याप संपुष्टात आलेला नाही. तसेच शांततेचा मार्ग अद्यापही खुला आहे. तर रशियाचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत वासिली नेबेजिया यांनी या हल्ल्याची तुलना २००३ इराक युद्धाशी केली. ते म्हणाले की, पुन्हा एकदा आपल्याला अमेरिकेच्या काल्पनिक कहाण्यांवर विश्वास ठेवण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील लाखो लोकांना त्रासाचा सामना करावा लागेल. अमेरिकेने भूतकाळातून काहीच धडा घेतलेला नाही, हेच यावरून सिद्ध होत आहे, असा टोलाही रशियाकडून लागवण्यात आला.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस या बैठकीच्या सुरुवातीला म्हणाले होते की, इराणच्या अणुकेंद्रावर अमेरिकेने केलेला हल्ला हे एक धोकायदायक वळण आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर त्वरित चर्चा करण्यासाठी आपण त्वरित आणि निर्णायक कारवाई केली पाहिजे.तर अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील कार्यवाहक राजदूत डोरेथी शिया यांनी सांगितले की, आता निर्णायक कारवाईची वेळ आली आहे. इराणने इस्राइलला संपवण्याचे आणि अणुबॉम्ब तयार करण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने इराणला सांगावे, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच इराण दीर्घकाळापासून आपला आण्विक कार्यक्रम लपवत आहे, असा दावाही त्यांनी केला.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech