bank of maharashtra

पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देवून टंचाईग्रस्त गावांसाठी सुयोग्य नियोजन करावे – मंत्री भुजबळ

0

येवला : येवला व निफाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता नागरिकांना नियमित, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. आज येवला शहरात येवला व निफाड तालुक्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळी यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे, येवला तहसीलदार आबा महाजन, निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नांदूर मध्यमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौळे, येवला गटविकास अधिकारी संदीप वायाळ, निफाड गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, तालुका क्रीडा अधिकारी शिवप्रसाद घोडके, येवला तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, येवला शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले की, तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये दैनंदिन टँकरच्या मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करावे व कोणतेही गाव पाणीटंचाईपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. ममदापूर वनविभाग क्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांसाठी पाणी साठवण तलाव भरलेले राहतील या दृष्टीने नियोजन करावे. पुणेगाव दरसवाडी कालव्याची उर्वरित कामे एप्रिल अखेर पूर्णत्वास न्यावीत. विविध पाणी पुरवठा योजनांतर्गत वीज बिल बचतीसाठी आवश्यक ठिकाणी सोलर प्रकल्पाची मर्यादा वाढवण्यात यावी. यावेळी ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, राजापूर व ४० गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव व १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, विंचूर लासलगाव सह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आदी कामांचा आढावा मंत्री भुजबळ यांनी घेतला.

अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करावा. येवला शहरातील महात्मा फुले नाट्यगृह, तात्या टोपे स्मारक, तालुका क्रीडा संकुल, शिवसृष्टीची अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करावीत तसेच शहरातील भुयारी गटारीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. पिंपळस-येवला चौपदरी रस्त्याच्या कामांना गती द्यावी. लासलगाव बाह्यवळण रस्त्याची कामे 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech