bank of maharashtra

पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ

0

– ‘गुलाबी जॅकेट’ने वेधले सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी आज नवी दिल्लीत राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह राज्यसभेतील सभागृह नेते जे. पी. नड्डा आणि राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांसारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.

पार्थ पवार यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या पेहरावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष ओळख असलेले ‘गुलाबी जॅकेट’ परिधान केले होते. अजितदादांच्या शैलीतील हा पेहराव पाहून उपस्थित अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना दाटून आल्या. केवळ पेहरावच नाही, तर पार्थ पवारांची देहबोली आणि आवाजातही काही प्रमाणात अजितदादांची प्रतिमा जाणवत होती.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबीय आणि पक्षावर मोठी जबाबदारी आली आहे. अशा वेळी पार्थ पवारांची ही नवी इनिंग राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अजितदादांच्या निधनानंतर राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पक्षाची धुरा सांभाळत आहेत. आता संसदेत पार्थ पवार यांची उपस्थिती राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी भूमिका बजावू शकते. पार्थ पवार यांनी यापूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राजकारणापासून ते अलिप्त होते. दिवंगत अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर पार्थ पवार हे त्यांच्यासोबत अधिक सक्रिय झाल्याचे दिसून आले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech