bank of maharashtra

नागपुरात स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ

0

नागपूर : नागपूरच्या सेंट्रल एव्हेन्यू परिसरात मोठ्या प्रमाणात जिवंत विस्फोटक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोसर भवन चौकातील मेट्रो स्टेशनच्या अगदी शेजारी आज, मंगळवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. दोसरभवन चौकात आज सकाळी एका घराजवळ संशयास्पद बॅग आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान त्या बॅगमध्ये तब्बल १५ जिलेटिन कांड्या, ५८ डिटोनेटर आणि ८ कनेक्टर आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार, ही बॅग मागील एक ते दीड महिन्यांपासून त्या ठिकाणी पडून होती. सकाळी बॅगमधील जिलेटिन कांड्या बाहेर दिसू लागल्याने घरमालकाने तत्काळ पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) तातडीने दाखल झाले. त्यांनी परिसर सील करून सखोल तपास केला आणि सर्व विस्फोटक साहित्य सुरक्षितपणे जप्त करून पुढील तपासासाठी हलवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनास्थळापासून सुमारे २०० मीटर अंतरावर जामा मशिद, ५०० मीटरवर पोद्दारेश्वर राम मंदिर आणि दीड ते दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्यामुळे हा परिसर संवेदनशील मानला जातो. अशा ठिकाणी ही स्फोटके आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्राथमिक तपासात नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटाशी या प्रकरणाचा संबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित स्फोटक साहित्य तेथून येथे आणून टाकण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

याबाबत पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, घटनास्थळावर आढळलेले सर्व साहित्य सुरक्षित करण्यात आले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech