लंडन: चीनमध्ये मिळणाऱ्या काळ्या केमिकल्सच्या आधारे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा अवैध व्यापार सुरू आहे. यापूर्वी अमेरिका हे चीनचे प्रमुख लक्ष्य होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर ड्रग्सविरोधात कडक कारवाई सुरू झाली. त्याचा परिणाम म्हणून आता हीच केमिकल्स मोठ्या प्रमाणावर युरोपमध्ये पुरवली जात आहेत.
युरोपच्या अहवालाने चीनच्या या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला आहे. युरोपमधील विविध देशांमध्ये छापे टाकून २४ औद्योगिक प्रयोगशाळा सील करण्यात आल्या असून १,००० टनांहून अधिक केमिकल्स जप्त करण्यात आली आहेत.
चीनमध्ये ही केमिकल्स उघडपणे विकली जातात. चिनी बाजारपेठांमधून ती खरेदी करणे अत्यंत सोपे आहे. चीनमध्ये ड्रग्ससाठी लागणाऱ्या केमिकल्सचा इतका मोठा व्यापार आहे की त्यावर नियंत्रण ठेवणे जवळपास अशक्य झाले आहे. याच कारणामुळे ही केमिकल्स बेकायदेशीर मार्गाने युरोपमध्ये पुरवली जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही केमिकल्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंसोबत कंटेनरमध्ये लपवून युरोपला पाठवली जातात. सीमाशुल्क तपासणीपासून बचाव करण्यासाठी बनावट आणि अवैध कागदपत्रांचा वापर केला जातो. युरोपमध्ये पोहोचल्यानंतर ही केमिकल्स रेल्वेमार्गे नेदरलँड्स, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक आणि पोलंडमधील प्रयोगशाळांमध्ये पाठवली जातात. याच ठिकाणी या केमिकल्सचे ड्रग्समध्ये रूपांतर केले जाते.
युरोपीय ड्रग प्रतिबंधक संस्थेच्या माहितीनुसार, या टोळ्यांमधील काही लोकांनी संपूर्ण प्रयोगशाळाच चीनमधून हलवून आणल्या होत्या. सुरुवातीला याच प्रयोगशाळांमध्ये काळ्या केमिकल्सचे ड्रग्समध्ये रूपांतर केले जात होते. मात्र आता अशाच प्रकारच्या प्रयोगशाळा युरोपमध्येच उभारल्या जात आहेत. नेदरलँड्समध्ये ड्रग्स तयार करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या सर्वाधिक असून तेथे मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचे उत्पादन होते
चीनमधून येणाऱ्या केमिकल्सपासून विविध प्रकारची ड्रग्स तयार केली जातात. अहवालानुसार, गेल्या वर्षी युरोपमध्ये सुमारे २ कोटी लोकांनी एमडीएमए (MDMA) ड्रग्सचे सेवन केले. लंडनमधील एका माध्यमाच्या मते, चिनी यंत्रणा या अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवण्याऐवजी अप्रत्यक्षपणे त्याला चालना देत आहेत. युरोपमध्ये मेथ आणि एक्स्टसीसारख्या ड्रग्सची बाजारपेठ सुमारे १.५ अब्ज पौंड (अंदाजे १८,८२३ कोटी रुपये) इतकी असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, अमेरिकेने यापूर्वीच चीनवर फेंटानिल ड्रग्जच्या पुरवठ्याचा आरोप केला आहे. 2024 मध्ये अमेरिकेत फेंटानिलच्या अतिसेवनामुळे 48 हजार लोकांचा मृत्यू झाला. यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर कारवाईचा इशारा देत याला ‘मास डिस्ट्रक्शन वेपन’ (सामूहिक विनाशाचे शस्त्र) घोषित केले होते. मात्र, लंडनस्थित चिनी दूतावासाने हे आरोप फेटाळून लावत ही चीनविरोधातील एक कट असल्याचे म्हटले आहे.
