bank of maharashtra

उत्तर भारतात दाट धुक्याची लाट; रेल्वे, विमान सेवांवर गंभीर परिणाम

0

नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा दाट धुके आणि खराब हवामानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका वाहतूक सेवांना बसत आहे. दृश्यमानता कमी झाल्यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. अनेक गाड्या ठरलेल्या वेळेपेक्षा तासन्‌तास उशिराने धावत आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये विमानसेवाही उशिराने सुरू आहेत किंवा रद्द होण्याची शक्यता आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उत्तर भारतात दाट धुक्यामुळे आतापर्यंत चार डझनहून अधिक गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. धुक्यामुळे गाड्यांचा वेग कमी ठेवण्यात येत असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रयागराज एक्सप्रेस सुमारे ५ तास, रीवा–आनंद विहार एक्सप्रेस सुमारे ९ तास, नवी दिल्ली तेजस राजधानी एक्सप्रेस ४ तास, ब्रह्मपुत्र मेल सुमारे ४५ मिनिटे, तर महाबोधी आणि संपूर्ण क्रांती एक्सप्रेस ४ ते ५ तास उशिराने धावत आहेत. याशिवाय अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्याही तासन्‌तास उशिराने आपल्या गंतव्यस्थानी पोहोचत आहेत.

खराब हवामानाचा परिणाम हवाई वाहतुकीवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. स्पाइसजेट, एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. दिल्ली विमानतळ प्रशासनानेही कमी दृश्यमानतेमुळे उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. सध्या दिल्ली विमानतळावर दहा पेक्षा जास्त उड्डाणे उशिराने सुरू आहेत. याचा परिणाम कनेक्टिंग फ्लाइट्सवरही होऊ शकतो. मात्र, विमान कंपन्या आणि रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या विमान किंवा गाडीची स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे प्रवासी एनटीईएस अ‍ॅपद्वारे, तर विमान प्रवासी संबंधित एअरलाईनच्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवरून ताजी माहिती मिळवू शकतात.

दरम्यान, धुक्याचा प्रभाव केवळ दिल्लीपुरताच मर्यादित नाही. अमृतसर, जम्मू, अयोध्या, गोरखपूर, वाराणसी, चंदीगड, पटना, दरभंगा, हिंडन, रांची, गुवाहाटी आणि बागडोगरा यांसारख्या शहरांमध्येही विमान आणि रेल्वे सेवांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात पुढील काही दिवस धुके कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech