bank of maharashtra

वैभव सूर्यवंशीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

0

नवी दिल्ली : बिहारचा १४ वर्षीय प्रतिभावान क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याला शुक्रवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. समारंभानंतर हा युवा क्रिकेटपटू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील विक्रमी कामगिरीनंतर वैभवला हा सन्मान मिळाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला विजय हजारे ट्रॉफीत अरुणाचल प्रदेशविरुद्ध वैभवने केवळ ८४ चेंडूंमध्ये १९० धावांची झंझावाती खेळी केली होती. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १५ षटकार मारले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर बिहारने ५० षटकांत ५७४ धावा करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

वैभवने फक्त ३६ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक झळकावणारा खेळाडू ठरला. या डावात वैभवने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एबी डी व्हिलियर्सचा सर्वात जलद १५० धावांचा विक्रमही मोडीत काढला. त्याचे १५ षटकार हे या प्रकारात एखाद्या भारतीय खेळाडूने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. याआधी वैभव अंडर-१९ आशिया चषकात खेळताना दिसला होता, जिथे त्याने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध १७१ धावांची आक्रमक खेळी करत शानदार सुरुवात केली होती.

मात्र, तो संपूर्ण स्पर्धेत हीच लय कायम ठेवू शकला नाही आणि अखेरीस भारताला अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. याच वर्षाच्या सुरुवातीला इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना या युवा खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावत आयपीएल इतिहासात एखाद्या भारतीयाने केलेले सर्वात जलद शतक नोंदवले होते.

उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असून तो ५ ते १८ वयोगटातील मुलांना दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी शौर्य, कला व संस्कृती, पर्यावरण, नवोन्मेष, विज्ञान व तंत्रज्ञान, सामाजिक सेवा आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान केला जातो. वैभवला हा पुरस्कार क्रीडा श्रेणीत मिळाला आहे. समारंभानंतर हा डावखुरा फलंदाज भारताच्या अंडर-१९ संघातील इतर खेळाडूंना जाऊन मिळेल आणि झिम्बाब्वेकडे रवाना होण्याची शक्यता आहे. कारण संघ १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आगामी अंडर-19 विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech