नवी दिल्ली : कॅनडातील टोरंटो विद्यापीठाच्या स्कारबोरो कॅम्पसजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत भारतीय वाणिज्य दूतावासाने गुरुवारी (२५ डिसेंबर) तीव्र शोक व्यक्त केला आहे. टोरंटो पोलिसांनी मंगळवारी सांगितले की हायलँड क्रीक ट्रेल आणि ओल्ड किंग्स्टन रोड परिसरात झालेल्या गोळीबारात शिवांक अवस्थी नावाच्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
या मृत्यूबाबत वाणिज्य दूतावासाने सांगितले की ते पीडिताच्या कुटुंबाच्या संपर्कात असून, स्थानिक अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत आवश्यक ती मदत पुरवत आहेत. वाणिज्य दूतावासाने ‘एक्स’या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, “टोरंटो विद्यापीठाच्या स्कारबोरो कॅम्पसजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तरुण भारतीय डॉक्टरेट विद्यार्थी शिवांक अवस्थी यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो. या कठीण काळात वाणिज्य दूतावास शोकाकुल कुटुंबाच्या संपर्कात असून, स्थानिक अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहे.”
वृत्तानुसार, गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तेथे गोळी लागून गंभीर जखमी झालेला एक व्यक्ती आढळून आला, ज्याला घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच संशयित आरोपी पळून गेले होते. तपासादरम्यान संबंधित परिसर बंद करण्यात आला.
माहितीनुसार, ही यंदाच्या वर्षातील टोरंटो शहरातील ४१ वी हत्या आहे. काही दिवसांच्या अंतरात गुन्हेगारी घटनांमुळे एखाद्या भारतीयाचा झालेला हा दुसरा मृत्यू आहे. याआधी टोरंटो पोलिसांनी सांगितले होते की शहरात ३० वर्षीय भारतीय वंशाच्या एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी संपूर्ण कॅनडामध्ये एका संशयिताविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे, जो मृत महिलेच्या ओळखीचा असल्याचे सांगितले जाते. मृत महिलेची ओळख टोरंटो येथील रहिवासी हिमांशी खुराणा अशी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात टोरंटोचा रहिवासी असलेला ३२ वर्षीय आरोपी अब्दुल गफूरी याचा शोध सुरू आहे.
