नवी दिल्ली : पूर्व आणि उत्तर भारतातील बहुतांश भागांना बुधवारी तीव्र थंडीचा फटका बसला. राजधानी दिल्लीमध्ये दाट धुके आणि अत्यंत कमी दृश्यतेमुळे हवाई तसेच रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. बुधवारी सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर धुक्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला, ज्यामुळे अनेक उड्डाणांना विलंब झाला तर काही उड्डाणे रद्द करण्यात आली. विमानतळावरून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये धावपट्टी (रनवे) आणि टर्मिनल परिसरात दाट धुके पसरलेले दिसत आहे. या प्रतिकूल हवामानामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली, तर अनेक प्रवाशांच्या कनेक्टिंग फ्लाइट्सही प्रभावित झाल्या.
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, मंगळवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर धुके आणि कमी दृश्यतेमुळे किमान १० उड्डाणे रद्द करण्यात आली, तर २७० हून अधिक उड्डाणे नियोजित वेळेपेक्षा उशिरा रवाना झाली. बुधवारी परिस्थिती आणखी बिघडली असून किमान २० उड्डाणे रद्द करण्यात आली आणि अनेक उड्डाणांना विलंब झाला. विमान कंपन्यांनी प्रवाशांना उड्डाणापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासण्याचा आणि अतिरिक्त वेळ घेऊन विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.
धुक्याचा परिणाम केवळ हवाई सेवांपुरता मर्यादित राहिला नाही. उत्तर भारतात दाट धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्याही त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा मोठ्या प्रमाणावर उशिरा धावत आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून समोर आलेल्या दृश्यांमध्ये फलाटांवर प्रवाशांची मोठी गर्दी आणि गाड्यांच्या प्रतीक्षेत उभे असलेले लोक दिसत आहेत. अनेक प्रवाशांनी सांगितले की त्यांच्या गाड्या ३ ते ६ तास उशिराने धावत असून, थंडीमध्ये त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी राजधानीतील हवा ‘गंभीर’ श्रेणीत नोंदवण्यात आली. यापूर्वी मंगळवारीही हवा गंभीर श्रेणीत पोहोचली होती. आज सकाळची सुरुवात धुके आणि दाट कोहऱ्याच्या जाड थराने झाली, तसेच स्मॉगची पातळीसुद्धा दिसून आली. दिल्लीसाठीच्या एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टमनुसार, बुधवारी सकाळी राजधानीचा वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३५५ इतका नोंदवण्यात आला असून, ही अत्यंत खराब श्रेणी मानली जाते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) सकाळी आठ वाजेच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील विविध भागांमध्ये AQI पुढीलप्रमाणे नोंदवण्यात आला आहे: अलीपूर – ३३३, आनंद विहार – ३७४,अशोक विहार – ३६२, आया नगर – २७१,बवाना – ३५२, बुराडी – ३२०, आणि चांदणी चौक परिसरात ३८२.
