बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे. इस्रोच्या ‘बाहुबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LVM3 रॉकेटने अमेरिकेचा ‘ब्लूबर्ड-ब्लॉक-2’ हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. संभाव्य अवशेषांमुळे प्रक्षेपणात सुमारे ९० सेकंदांचा विलंब झाला होता. ब्लूबर्ड-ब्लॉक-२ उपग्रहाचा उद्देश जगभरातील स्मार्टफोनना थेट उच्च-गती सेल्युलर ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देणे हा असून, त्यामुळे जागतिक मोबाइल कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार आहे.इस्रोने आज पुन्हा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. भारताच्या जडवाहक LVM3-M6 रॉकेटचे प्रक्षेपण यशस्वी झाले. या व्यावसायिक मोहिमेअंतर्गत अमेरिकेच्या पुढील पिढीतील उपग्रहाला पृथ्वीच्या निम्न कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिट) स्थापित करण्यात आले. इस्रोकडून प्राप्त माहितीनुसार, हे प्रक्षेपण आज, बुधवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी ८.५४ वाजता सतीश धवन अंतराळ केंद्रातून होणार होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे त्यात ९० सेकंदांचा विलंब झाला. या मोहिमेद्वारे अमेरिकेच्या एएसटी स्पेसमोबाइल कंपनीचा ब्लूबर्ड-ब्लॉक-२ अवकाशयान अंतराळात पाठवण्यात आला.
ब्लूबर्ड-ब्लॉक-२ हा आजपर्यंत एलव्हीएम ३ द्वारे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवण्यात आलेला सर्वात जड पेलोड आहे. या उपग्रहाचे वजन सुमारे ६,१०० किलोग्रॅम आहे. यापूर्वी हा विक्रम ४,४०० किलोग्रॅम वजनाच्या सीएमएस-०३ संप्रेषण उपग्रहाच्या नावावर होता, जो २ नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आला होता. इस्रोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ने अमेरिकेच्या AST स्पेसमोबाइल कंपनीसोबत करार केला होता. प्रक्षेपणानंतर सुमारे १५ मिनिटांत हा उपग्रह रॉकेटपासून वेगळा होईल आणि सुमारे ६०० किलोमीटर उंचीवरील लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये स्थापित केला जाईल.
लाँच व्हेईकल मार्क-३ (LVM3) हे भारताचे सर्वात शक्तिशाली रॉकेट असून, त्यामुळेच त्याला ‘बाहुबली’ रॉकेट असेही संबोधले जाते. इसरोने स्पष्ट केले आहे की ६,१०० किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह LVM3 द्वारे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला आजवरचा सर्वात जड पेलोड आहे.ब्लूबर्ड-ब्लॉक-२ चे प्रक्षेपण इसरोच्या व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) मार्फत करण्यात आले. यासाठी अमेरिकेच्या AST स्पेसमोबाइल (AST अँड सायन्स, एलएलसी) कंपनीने NSIL सोबत करार केला होता. ही मोहीम NSIL आणि अमेरिका-आधारित AST स्पेसमोबाइल यांच्यातील व्यावसायिक कराराअंतर्गत राबवण्यात आली.
हा उपग्रह जगभरातील स्मार्टफोनना थेट उच्च-गती सेल्युलर ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी डिझाइन करण्यात आला असून, तो मोबाइल कनेक्टिव्हिटीसाठी जागतिक LEO तारामंडलाचा एक भाग ठरणार आहे. AST स्पेसमोबाइल ही अवकाश-आधारित पहिली सेल्युलर ब्रॉडबँड नेटवर्क प्रणाली विकसित करत असून, यामुळे स्मार्टफोन थेट उपग्रहांशी जोडले जातील. हे नेटवर्क जगातील कुठल्याही ठिकाणी 4G आणि 5G व्हॉईस व व्हिडीओ कॉल, मेसेजिंग, स्ट्रीमिंग आणि डेटा सेवा उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान, प्रक्षेपणापूर्वी इसरोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी मंगळवारी तिरुमाला येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात पूजा केली होती.
