bank of maharashtra

जिनेव्हामधील भारताच्या स्थायी दुतावासातून २ कोटींची अफरातफर

0

सीबीआयकडून चौकशी सुरू

नवी दिल्ली : सीबीआयने जिनेव्हामधील भारताच्या स्थायी दुतावासामध्ये दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात माजी लेखा अधिकारी मोहित याच्यावर क्रिप्टो-जुगाराशी संबंधित उपक्रमांसाठी सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. सीबीआयनुसार, मोहितने सुमारे २ लाख स्विस फ्रँक (अंदाजे दोन कोटी रुपये) रकमेची अफरातफर केल्याचा संशय आहे. ही रक्कम त्याने आपल्या क्रिप्टो-जुगार उपक्रमांसाठी वापरल्याचे तपासात समोर आले आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोहितने १७ डिसेंबर २०२४ रोजी जिनेव्हामधील स्थायी मिशनमध्ये सहाय्यक विभाग अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्याच्यावर युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड (यूबीएस) येथे भौतिक स्वरूपात देयक निर्देश सादर करण्याची जबाबदारी होती. मिशनची खाती अमेरिकी डॉलर (यूएसडी) आणि स्विस फ्रँक (सीएचएफ) मध्ये होती, मात्र ही अफरातफर सीएचएफ खात्यात आढळून आली.मिशनकडून स्विस विक्रेत्यांना त्यांच्या बीलांच्या आधारे स्विस फ्रँकमध्ये देयके केली जात होती. या बीलांवर विक्रेत्यांचे बँक तपशील असलेले पूर्व-मुद्रित क्यूआर कोड छापलेले होते. क्यूआर कोडची छायांकित प्रत तसेच दूतावासातील नियुक्त अधिकारी आणि डीडीओ तुषार लकरा यांच्या स्वाक्षरी असलेली देयक पावती यूबीएस बँकेत जमा केली जात होती.

मोहितला हे क्यूआर कोड आणि देयक पर्च्या स्वतः यूबीएस बँकेत नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच, दूतावास प्रमुख अमित कुमार यांच्यासह खात्यांची माहिती पाहण्याचा अधिकारही त्याला होता. तपासात असा संशय व्यक्त केला जात आहे की, मोहितने काही विक्रेत्यांचे क्यूआर कोड गुपचूप बदलून स्वतः तयार केलेले क्यूआर कोड लावले, ज्यामुळे देयके विक्रेत्यांच्या खात्यांऐवजी यूबीएसमधील त्याच्या वैयक्तिक सीएचएफ खात्यात वर्ग झाली.या पद्धतीचा वापर करून त्याने यावर्षी सुमारे २ लाख स्विस फ्रँक (दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक) रक्कम आपल्या खासगी खात्यात वळवली. या प्रक्रियेत मूळ क्यूआर कोडशी संबंधित छापील पावत्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. तसेच, मासिक बँक स्टेटमेंटमध्ये स्वतःचे नाव बदलून संबंधित विक्रेत्याचे नाव दाखवून त्याने निधी वळवण्याचा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech