नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारत सध्या तीव्र थंडीच्या तडाख्यात सापडला आहे. सकाळी आणि रात्री दाट धुक्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. दृश्यमानता कमी झाल्याने रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.केवळ दिल्लीतच १२९ उड्डाणे रद्द करण्यात आली. रविवारीही अनेक उड्डाणे रद्द झाली असून, रेल्वेगाड्यांच्या वेगावरही मर्यादा आल्या आहेत. दाट धुक्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची गती मंदावली आहे.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाट धुके आणि धुरकट वातावरणामुळे शनिवारी रद्द झालेल्या १२९ उड्डाणांपैकी ६३ प्रस्थानाची तर ६६ आगमनाची उड्डाणे होती. नागरी उड्डयन मंत्रालय, विमानतळ प्राधिकरण आणि विविध विमान कंपन्यांनी सध्याच्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी सूचना (अॅडव्हायझरी) जारी केल्या आहेत. प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी आपल्या उड्डाणाची अद्ययावत स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.रेल्वे वाहतूकही बाधित झाली.
इंडिगो एअरलाईनने शनिवारी प्रवास सल्ला जारी केला. या सल्ल्यात रविवारी दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक भागांत सकाळच्या वेळेत दाट धुके राहण्याची शक्यता असून, त्यामुळे उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. कमी दृश्यमानतेमुळे उड्डाणांना विलंब होऊ शकतो किंवा वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे, असेही एअरलाईनने स्पष्ट केले. जारी केलेल्या निवेदनात इंडिगोने सांगितले की त्यांची ऑपरेशन्स टीम पूर्णतः सतर्क राहील आणि हवामान परिस्थितीवर प्रत्येक मिनिटाला लक्ष ठेवले जाईल, जेणेकरून प्रवाशांना होणारी गैरसोय कमीत कमी राहील.
हवामानामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची दखल घेत एअरलाईनने प्रवाशांच्या संयमाबद्दल आभार मानले आहेत. सल्ल्यात पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे की सकाळच्या वेळेत धुक्यामुळे दिल्ली आणि उत्तर भारतातील काही भागांत दृश्यमानता अचानक कमी होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम उड्डाण संचालनावर होईल. इंडिगोने नमूद केले की प्रवाशांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळाकडे निघण्यापूर्वी आपल्या उड्डाणाची ताजी स्थिती तपासावी. ज्यांच्या उड्डाणांवर परिणाम होईल, ते प्रवासी एअरलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावरून तिकीट पुन्हा बुक करू शकतात किंवा परताव्यासाठी (रिफंड) अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये धुके आणि प्रदूषणामुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीबीसी) माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजता दिल्लीतील अनेक निरीक्षण केंद्रांवर वायुगुणवत्ता निर्देशांक (AQI) ४०० च्या पुढे नोंदवला गेला. सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार, राजधानीतील २४ निरीक्षण केंद्रांपैकी १९ केंद्रांवर AQI 400 पेक्षा जास्त होता.
आज सकाळी चांदणी चौक हा दिल्लीतील सर्वाधिक प्रदूषित भाग ठरला, जिथे AQI 455 नोंदवला गेला. याशिवाय वजीरपूरमध्ये ४४९, बवाना येथे ४४६, तर जहांगीरपुरी आणि रोहिणी येथे ४४४ AQI नोंदवला गेला. आनंद विहारमध्येही परिस्थिती अत्यंत खराब असून येथे AQI ४३८ पर्यंत पोहोचला. अशोक विहार आणि मुंडका या भागांतही प्रदूषणाची पातळी ४३० च्या पुढे राहिली. मात्र, आयजीआय विमानतळावर तुलनेने कमी म्हणजे ३३६ AQI नोंदवला गेला. लोधी रोड येथे ३५९, अलीपूरमध्ये ३८० आणि बुराडीमध्ये ३८६ AQI नोंदवण्यात आला. आर. के. पुरममध्येही ३९८ AQI सह हवा गुणवत्ता गंभीर पातळीच्या जवळच राहिली.
