नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) रद्द करून नवीन योजना सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाविरुद्ध मंगळवारी संसद भवन संकुलातील प्रेरणा स्थळ आणि मकर द्वार येथे इंडी आघाडीच्या खासदारांनी निदर्शने केली. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, प्रियंका गांधी, खासदार माणिकम टागोर आणि दीपेंदर हुडा, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि सपा खासदार धर्मेंद्र यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदारांनी निदर्शनात भाग घेतला. निदर्शकांनी महात्मा गांधींचे फोटो आणि “महात्मा गांधी” लिहिलेले पोस्टर हातात घेतले होते. “महात्मा गांधी अमर रहे” च्या घोषणाही देण्यात आल्या.
केंद्र सरकार मनरेगाऐवजी नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणण्याची तयारी करत आहे. चालू हिवाळी अधिवेशनात तो चर्चेसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. प्रस्तावित विधेयकाला “विकसित भारत – रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण)” (व्हीबी-जी राम जी) विधेयक, २०२५ असे नाव देण्यात आले आहे. प्रस्तावित विधेयकात ग्रामीण भागात रोजगार दिवसांची संख्या १०० वरून १२५ दिवसांपर्यंत वाढवण्याची तरतूद आहे.
