bank of maharashtra

दिल्ली–एनसीआरमध्ये प्रदूषणाचा कहर कायम

0

नवी दिल्ली : दिल्ली आणि एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी सतत गंभीर श्रेणीत राहिली असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. अनेक भागांमध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४०० च्या पुढे गेला आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असले तरी परिस्थिती चिंताजनक आहे.

हिवाळ्याची चाहूल लागताच दिल्लीतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजधानीचे आकाश दाट धुक्याच्या आच्छादनाखाली आहे आणि हवेत प्रदूषकांचे प्रमाण वाढल्याने लोकांना डोळ्यांत जळजळ, श्वास घेण्यास त्रास तसेच दृश्यता कमी होण्याच्या समस्या जाणवत आहेत. तज्ज्ञांच्या मते, स्थानिक उत्सर्जन, हवामानातील बदल आणि शेजारील शहरांतून येणारे प्रदूषक या तिन्ही गोष्टी मिळून परिस्थिती अधिक गंभीर बनवत आहेत. सीपीसीबीच्या माहितीनुसार, मंगळवारी दिल्लीचा एक्यूआय वाढून ३७२ वर पोहोचला, जो सोमवारी ३०४ आणि रविवारी २७९ होता. ३९ पैकी १६ निरीक्षण केंद्रांमध्ये एक्यूआय ४०० च्या वर ‘गंभीर’ श्रेणीत नोंदला गेला. यामध्ये बुराडी, आनंद विहार, विवेक विहार, मुंडका, बवाना, रोहिणी आणि पंजाबी बाग या भागांचा समावेश आहे.

निर्णय समर्थन प्रणालीच्या अहवालानुसार दिल्लीच्या प्रदूषणात १८.४ टक्के वाटा वाहन उत्सर्जनाचा असून ९.२ टक्के हिस्सा उद्योगांचा आहे. त्याशिवाय नोएडा, गाझियाबाद, बागपत, गुरुग्राम आणि पाणिपत येथून येणाऱ्या उत्सर्जनामुळेही प्रदूषणाची पातळी वाढली आहे. हवामान विभागाने सांगितले की दक्षिण–पश्चिमेकडून हलक्या गतीने वारा वाहत असल्याने प्रदूषणाचा प्रसार कमी झाला असून हवामान ‘अतिशय खराब’ ते ‘गंभीर’ या श्रेणीत राहण्याची शक्यता आहे.

त्यासोबतच आज, बुधवार सकाळीही हवेची गुणवत्ता अत्यंत खराब नोंदली गेली. अनेक ठिकाणी एक्यूआय धोकादायक पातळीवर पोहोचला. वजीरपूर हा सर्वाधिक प्रदूषित भाग ठरला, जिथे एक्यूआय ४८२ नोंदला गेला—जो ‘गंभीर प्लस’ श्रेणीचे निदर्शक आहे. आर.के. पुरममध्येही स्थिती चिंताजनक असून तेथे एक्यूआय ४२७ इतका आढळला, तर रोहिणीमध्ये एक्यूआय ३७८ नोंदला गेला, जो ‘अतिशय खराब’ श्रेणीत मोडतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या भागांत औद्योगिक क्रियाकलाप, दाट लोकसंख्या आणि मंद वाऱ्यामुळे प्रदूषकांचं प्रमाण अधिक साचत आहे, त्यामुळे लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech