सत्ताधारी भाजपकडून कारवाईची मागणी
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या व राज्यसभा सदस्य रेणुका चौधरी आपल्या पाळीव कुत्र्यासह संसद परिसरात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवर भाजपने कडाडून विरोध व्यक्त करत विशेषाधिकारांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे. तसेच रेणुका चौधरींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. संसदेच्या आज, सोमवारी सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या जोरदार गोंधळामुळे कामकाजाला वारंवार स्थगिती द्यावी लागली. याच दरम्यान संसद परिसरात रेणुका चौधरी आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन आल्या. उच्च सुरक्षा क्षेत्रात अशा प्रकारे पाळीव प्राण्याला घेऊन येण्याविषयी काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात प्रतिक्रिया देताना रेणुका चौधरी म्हणाल्या की, गप्प बसलेला निरुपद्रवी प्राणी आत आला तर त्यात काय अडचण आहे ? तो कुणाला चावत नाही. चावणारे तर संसदेत इतरच आहेत. त्यांच्या या वक्तव्याने वाद अधिकच चिघळला. रेणुका चौधरी आपल्या कारमधून संसदेत पोहोचल्या तेव्हा पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कारजवळ गर्दी केली.
त्यावेळी कारमध्ये पाळीव कुत्रा बसलेला दिसल्याने तो चर्चेचा विषय ठरला. यावेळी चौधरी म्हणाल्या की, सरकारला कदाचित आत प्राणी असणे आवडणार नाही, पण हा छोटासा जीव कुणाला काही इजा करणार नाही. जर कुणाला चावण्याची चिंता असेल, तर ती या कुत्र्यामुळे नाही; संसदेत काही लोकांमुळे आहे. सुरक्षा मुद्द्यांवरील प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी विचारले, “आपण नेमकी कोणती सुरक्षा समस्या मानतो? कुत्र्यालाही येऊ द्या असे त्यांनी सांगितले.
भाजपने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. खासदार जगदंबिका पाल म्हणाले की, खासदारांना दिलेले विशेषाधिकार हे नियम तोडण्याची किंवा पाळीव प्राणी संसदेत आणण्याची मुभा देत नाहीत. संसद ही देशाच्या धोरणांवर चर्चा करण्याची पवित्र जागा आहे. अशा ठिकाणी कुत्रा आणणे आणि त्यावर केलेली वक्तव्ये देशाला लज्जास्पद आहेत. त्यांच्या विरोधात नक्कीच कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली.
