नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची आज, म्हणजेच १ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधला आणि या दरम्यान विरोधकांना कडक संदेश देताना मोदी म्हणाले, “ड्रामा करण्यासाठी खूप जागा आहेत—ज्यांना करायचा आहे ते करत राहावेत—पण इथे ड्रामा नाही, तर डिलिव्हरी हवी. पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे हिवाळी अधिवेशन ही केवळ एक प्रथा नसून, देशाला वेगाने प्रगतीच्या दिशेने नेण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना नवी ऊर्जा देणारे आहे, असा मला विश्वास आहे. भारताने लोकशाहीला जगले आहे. लोकशाहीतील उमेद आणि उत्साह आपण वेळोवेळी व्यक्त केला आहे, त्यामुळे लोकशाहीवरील विश्वास सतत अधिक मजबूत होत जातो.”
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “खूप काळापासून माझी सर्वात मोठी चिंता अशी आहे की प्रथमच निवडून आलेले किंवा वयाने लहान असलेले सर्व पक्षांचे अनेक खासदार अतिशय त्रस्त आणि दुःखी आहेत. त्यांना त्यांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवण्याची, आपल्या मतदारसंघातील समस्या मांडण्याची संधी मिळत नाही.” मोदी यांनी यावरही भर दिला की, “राष्ट्राच्या विकासयात्रेत योगदान देण्यासाठी ते काही विचार मांडू इच्छितात, पण त्यावरही अडथळे आणले जात आहेत. कोणताही पक्ष असो, नवीन पिढीच्या खासदारांना संधी दिलीच पाहिजे. त्यांच्या अनुभवांचा सदनाला लाभ व्हावा. माझी विनंती आहे की आपण ही गोष्ट गंभीरतेने घेतली पाहिजे.”
विरोधकांना कठोर संदेश देताना मोदी म्हणाले, “ड्रामा करण्यासाठी खूप जागा आहेत—ज्यांना करायचा आहे ते करत राहावेत—पण इथे ड्रामा नाही, तर डिलिव्हरी हवी. घोषणाबाजीसाठीही संपूर्ण देश आहे. जितके नारे द्यायचे असतील तिथे द्या; जिथे पराभूत होऊन आले आहात, तिथेही दिलेत; जिथे पराभूत होण्यासाठी जाणार आहात तिथेही देऊ शकता. पण इथे नारे नव्हे, तर धोरणांवर भर दिला पाहिजे—ती तुमची नीयत असली पाहिजे.” ते पुढे म्हणाले की, “कदाचित राजकारणात नकारात्मकतेचा काही उपयोग होत असेल, पण राष्ट्रनिर्माणासाठी सकारात्मक विचारही आवश्यक आहे. नकारात्मकतेला मर्यादेत ठेवून देशनिर्माणावर लक्ष द्या, ही माझी अपेक्षा आहे.”
मोदी म्हणाले, “आपले नवे सभापती आजपासून उच्च सदनाचे मार्गदर्शन करतील—मी त्यांना शुभेच्छा देतो. GST सुधारणा—म्हणजे नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स—यांनी देशवासीयांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. त्या दिशेने अनेक कामे होणार आहेत. काही काळापासून आपल्या सदनाचा वापर फक्त निवडणुकांसाठी वॉर्म-अप म्हणून किंवा पराभवाच्या चिडचिडीचा उद्रेक करण्यासाठी केला जात आहे.”
ते म्हणाले, “काही राज्यांमध्ये अनेक वर्ष सत्तेत राहिल्यानंतर इतका प्रचंड विरोधभाव आहे की तिथे ते लोकांमध्ये जाऊन आपली बाजूही मांडू शकत नाहीत. त्यामुळे संपूर्ण राग ते इथे सदनात येऊन काढतात. काही पक्षांनी आपल्या राज्यातील राजकारणासाठी संसदेला वापरण्याची नवी परंपरा निर्माण केली आहे. त्यांनी एकदा विचार करावा—१० वर्षे हे खेळ खेळूनही देश त्यांना स्वीकारत नाही. त्यामुळे रणनीती बदला.” शेवटी पंतप्रधान म्हणाले, “मी त्यांना टिप्स देण्यासही तयार आहे—कसे परफॉर्म करावे ते सांगेन. पण किमान खासदारांच्या हक्कांवर तरी गदा आणू नका. खासदारांना बोलण्याची संधी द्या. आपल्या निराशा आणि पराभवाच्या भरात खासदारांची आहुती देऊ नका.”
