संजय राऊत यांना उत्तम आरोग्यासाठी दिल्या शुभेच्छा
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना भाजप आणि शिवसेना यांच्यात कोणताही दुरावा नसल्याचे स्पष्ट केले. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात सतत चर्चा होतच असते. आमच्यात गैरसमज, दुरावा किंवा मतभेद नाहीत,” असे शिंदे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बोलताना शिंदे म्हणाले, “नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका या स्थानिक नेतृत्वावर आधारित असतात. या निवडणुका पक्षांची नव्हे तर स्थानिक उमेदवारांची ताकद ठरवतात. त्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार केला आहे.”
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील काही नगरपरिषदेच्या निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती थांबवणे योग्य नाही. पण राज्यात असे घडले ही दुर्दैवी बाब आहे. याबाबतची माहिती मी घेत आहे आणि नंतर माध्यमांशी याबाबत बोलू.” शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर काल छापा पडल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी होईल. यात काही गंभीर किंवा विशेष असे नाही”. भाजप नेते अमित शहा शिवसेनेचा ‘कोथळा बाहेर काढणार’ असल्याचा दावा तसेच शिवसेनेचे ३५ आमदार फुटणार असल्याच्या संजय राऊत यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता शिंदे यांनी थेट राजकीय प्रतिक्रिया न देता संयमाने उत्तर दिले. “मी संजय राऊत यांना त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो,” एवढेच शिंदे म्हणाले.
