bank of maharashtra

‘व्ही. शांताराम’ लवकरच मोठ्या पडद्यावर, पहिलं पोस्टर आऊट

0

भारतीय चित्रपटाचा पहिला गेमचेंजर, पहिलं पोस्टर आऊट आणि सोशल मीडियावर धुमाकूळ

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. या महापुरुषाचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटाच्या महाकाव्यातून उलगडणार आहे. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार आहे.

‘झनक झनक पायल बाजे’च्या नृत्यवैभवापासून ‘दो आंखें बारह हाथ’च्या सामाजिक विचारांपर्यंत, ‘अमृतमंथन’च्या तांत्रिक क्रांतीपासून ‘नागरिक’च्या वास्तववादी कथानकापर्यंत व्ही. शांताराम यांच्या प्रत्येक कलाकृतीने भारतीय चित्रपटाला नवी दिशा दिली. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष, सर्जनशील ध्यास आणि जग बदलण्याच्या अढळ विश्वासाची उज्ज्वल परंपराच. आता त्यांचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन एका मेगा बायोपिकच्या रूपात मोठ्या पडद्यावर येत आहे. जे व्हिज्युअली ग्रँड, इमोशनली पॉवरफुल आणि सिनेमॅटिकली आयकॉनिक असणार आहे.

‘व्ही. शांताराम’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मिडियावर या पोस्टरने धुमाकूळ घातला आहे. यातील वैभव, भव्यता, दृश्य पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची नवी लाट उसळली आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार असून ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील एक गेम चेंजर ठरणार आहे. ‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले असून भव्य दृश्यरचना आणि कलात्मक दृष्टीने त्यांनी या चित्रपटाला एका विशिष्ट उंचीवर नेले आहे.

दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे म्हणतात, ‘’व्ही. शांताराम हे नाव उच्चारताना केवळ एका व्यक्तीची चर्चा होत नाही, तर भारतीय चित्रपटाची संपूर्ण तत्त्वज्ञानपर परंपरा डोळ्यांसमोर उभी राहाते. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांची निष्ठा, प्रयोगांची भीती न बाळगता कलाप्रवाहात झेप घेण्याची त्यांची हिंमत हे सर्व पडद्यावर साकारताना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळाली. या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, हाच माझा प्रयत्न आहे.’

निर्माते राहुल किरण शांताराम म्हणतात, ‘’हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी केवळ प्रोजेक्ट नसून ती एक भावना आहे. हा चित्रपट म्हणजे आमच्या सर्वांकडून आजोबांच्या कर्तृत्वाला वाहिलेली भव्य श्रद्धांजली आहे. व्ही. शांताराम यांनी भारतीय चित्रपटाला दिलेले योगदान किती अपरिमित आहे, हे आजच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा आमच्या निर्मितीमागचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या जीवनातील तेज, त्यांची दृष्टी, त्यांची धडपड हे सर्व जगाने पुन्हा अनुभवावे, म्हणून हा चित्रपट आम्ही अत्यंत भव्यतेने, तांत्रिक उत्कृष्टतेने आणि संवेदनशीलतेने साकारत आहोत.”

निर्माते सुभाष काळे म्हणतात, ‘’ व्ही. शांताराम हे नाव उच्चारलं की, भारतीय चित्रपट घडवणाऱ्या एका संपूर्ण परंपरेचा इतिहास समोर उभा राहातो. आपल्या देशातील एका मराठी माणसाने जागतिक दर्जाचा उद्योग घडवण्यात इतकं मोठं योगदान दिलं, ही गोष्ट अभिमानास्पद तर आहेच, परंतु आजच्या पिढीसाठी प्रेरणादायीही आहे. त्यांच्या प्रत्येक प्रयोगात एक नवी दृष्टी, एक नवा विचार आणि कलाकौशल्याचा अद्वितीय आविष्कार होता. या चित्रपटातून आम्ही त्या वैभवाचा, त्या संघर्षाचा आणि त्या भव्य परंपरेचा खरा आत्मा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.’’ राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स ॲण्ड रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे निर्माते आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech