नवी दिल्ली : भाजपा नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज, शुक्रवारी फेटाळून लावली आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र न्या. जे.के. माहेश्वरी आणि न्या. विजय बिष्णोई यांच्या खंडपीठाने आज ती फेटाळली. यापूर्वी गुडधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात देखील याचिका केली होती, ती सुद्धा निकाली काढण्यात आली होती. या निवडणुका ईव्हीएमवर घेतल्याने फडणवीस यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी गुडधे यांनी या याचिकेतून केली होती. निवडणुकीत प्रक्रियात्मक त्रुटी व भ्रष्ट पद्धतींचा वापर केल्याचा निवडणूक याचिकेत दावा केला होता. यापूर्वी सुद्धा गुडधे यांनी अनेकदा फडणवीसांना आव्हान दिले होते. पण, प्रत्येक वेळी त्यांना तेथेही पराभवच पहावा लागला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल गुडधे यांनी याआधी दोन वेळा विधानसभेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढवली आहे. विधानसभेत गुडधे यांना दक्षिण-पश्चिम नागपूर कधीच विजय मिळवता आला नाही. त्याचप्रमाणे भाजपाला महापालिकेच्या निवडणुकीत गुडधे यांना पराभूत करता आलं नाही. गुडधे नागपूर महापालिकेत काँग्रेसचे गटनेते होते. अभ्यासू नगरसेवक आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे.
