bank of maharashtra

महाराष्ट्रात पैशांचा पाऊस की अतिवृष्टी, सत्तेचा माज पाहतोय – उद्धव ठाकरे

0

मुंबई : पैशांचा वाटप, पैशांचा पाऊस किंवा अतिवृष्टी भयानक पद्धतीने महाराष्ट्रात सुरू आहे. एकप्रकारे सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतोय, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खंत व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ज्याप्रकारे मी आठ-दहा दिवसांपूर्वी मराठवाड्यात शेतकऱ्यांसोबत जाऊन बसलो होतो, तेव्हा त्यांची दु:ख, वेदना आणि व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना धीर दिला. त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांसोबत जाऊन बसत नाही, नागरिकांशी बोलत नाही, फक्त जिथे जात आहेत, तिथे पैशांच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत.

मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा आरेमधल्या कारशेडला तात्काळ स्थगिती दिली. माझा मेट्रोला विरोध नव्हता. कांजूरमार्गची जागा या सरकारने घेतली आहे. आरेमध्ये जी झाडं कापली त्यामुळे प्रदूषण वाढलंय. नियोजनशून्य विकासामुळे प्रदूषण वाढलंय. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विकासाचा प्लान आहे. हे एकमेव शहरात असलेलं जंगल आहे. या जंगलात झाडचं नाहीत, तर बिबट्यापासून प्राण्यांच्या पिढ्या वर्षानुवर्षापासून इथे राहतायत. आता या उद्यानाच्या विकासाचा प्लान आहे. जे मुंबईत चालू आहे तेच नाशिकमध्ये चालू आहे. नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होत आहे. हजारो, लाखो साधूसंत, भाविक तिथे येणार. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सुविधा पुरवण्याचं काम सरकारचं आहे. प्रयागराज कुंभमेळ्याच्या वेळी तिथे चेंगराचेंगरी झाली. किती भाविकांना प्राण गमवावे लागले, त्याचा आकडा समोर आलेला नाही. भाविकांची, साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे काम शासनाचं आहे. आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला जात नाही. या कोड्याचं उत्तर कुंभमेळ्याच्या खर्चात आहे का?, असा प्रश्न ठाकरेंनी विचारला.

मुंबईत मागच्या दोन ते तीन वर्षात प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर्षी सुद्धा अनुभव घेत आहोत. मुंबईची हवा आरोग्यासाठी घातक होत चालली आहे. इथियोपियामध्ये जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्याचे ढग इथे आले की काय असं वाटेल. पण इथोयोपियाच्या ज्वालामुखीचा आणि मुंबईच्या प्रदूषणाचा काही संबंध नाही. हा इथल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीची उद्रेक आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग मुंबई आणि महाराष्ट्रवर घोंगावत आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech