नवी दिल्ली : इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा भारत दौरा स्थगित झाल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की पंतप्रधान नेतन्याहू यांनी सुरक्षा कारणांमुळे आपला प्रस्तावित भारत दौरा पुढे ढकलला आहे. मात्र इस्त्रायलने मंगळवारी (२५ नोव्हेंबर) हे सर्व दावे फेटाळून लावले. पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्वतः सांगितले की त्यांना भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि दोन्ही बाजू दौऱ्याच्या नवीन तारखांवर समन्वय साधत आहेत.
इस्त्रायली पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत एक पोस्टही केली आहे.या पोस्टमध्ये म्हटले आहे, “भारत आणि इस्त्रायल यांचे संबंध तसेच पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नातेसंबंध अत्यंत दृढ आहेत.”पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, “पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या सुरक्षेवर पंतप्रधान नेतन्याहू यांना पूर्ण विश्वास आहे आणि टीम आधीच नवीन दौऱ्याच्या तारखेवर समन्वय साधत आहे.”
इस्त्रायली माध्यमांच्या एका गटाने अशी बातमी दिली होती की नेतन्याहू डिसेंबरमध्ये २०१८ नंतरच्या आपल्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीला येणार होते, परंतु महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दौरा स्थगित करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की या बातम्या केवळ ‘अटकळां’वर आधारित असून ‘भ्रामक’ आहेत. त्यांनी सांगितले की बेंजामिन नेतन्याहू यांच्या दौऱ्यासाठी परस्परांना सोयीस्कर अशा तारखांचे अंतिम निर्धारण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रिपोर्ट्सनुसार बेंजामिन नेतन्याहू वर्षाच्या अखेरीस भारतात येण्याच्या विचारात होते. तथापि, यंदा ही तिसरी वेळ आहे की त्यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. ते २०१८ मध्ये शेवटचे भारतात आले होते. त्या वेळी ते १४ जानेवारी ते १९ जानेवारी या सहा दिवसांच्या भेटीसाठी भारतात होते आणि तो त्यांचा भारताचा दुसरा दौरा होता.
