कोलकाता : निवडणूक आयोगातर्फे केले जाणारे मतदार यादीचे विशेष पुनरीक्षण (एसआयआर) करण्यामागचा उद्देश मागच्या दाराने राष्ट्रीय नागरीक नोंदणी ( एनआरसी) लागू करणे असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. कोलकात्यातील रेड रोडवर स्थित डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याला संविधान दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही लोकांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. त्यांनी संविधानाला राष्ट्राची कणा असे संबोधले आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित केली. एसआयआर मागचा खरा हेतू गुपचूप पद्धतीने एनआरसी लागू करणे आहे.
यापूर्वी ट्विटरवरील (एक्स) एका पोस्टमध्ये ममता म्हणाल्या की जेव्हा लोकशाही धोक्यात येते, धर्मनिरपेक्षता संकटात असते आणि संघवाद कोलमडवला जातो, तेव्हा जनता संविधानाने दिलेल्या मार्गदर्शनाचे संरक्षण करायला हवे. संविधान हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहे, जे भारताची संस्कृती, भाषा आणि समुदायांची विविधता अतिशय कुशलपणे एकत्र बांधून ठेवते. त्यांनी लिहिले “आज संविधान दिनानिमित्त मी आपल्या महान संविधानाला आणि या देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या या अमूल्य दस्तऐवजाला आदरांजली वाहते.” तसेच त्यांनी संविधानाच्या दूरदर्शी निर्मात्यांना, विशेषतः त्याचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
