bank of maharashtra

अयोध्येतील राममंदिराच्या शिखरावर फडकली धर्मध्वजा

0

अयोध्या : अयोध्येतील नव्याने उभारलेल्या भव्य-दिव्य राममंदिराच्या आकाशस्पर्शी मुख्य शिखरावर आज, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजेचे विधिवत आरोहण करण्यात आले. सुमारे २ किलो वजनाचा केशरिया ध्वज जेव्हा १६१ फूट उंच शिखरावर फडकू लागला, तेव्हा मंदिराच्या पूर्णत्वाचे एक अद्वितीय व पवित्र प्रतीक जणू प्रत्यक्ष प्रकट झाले, अशी भावना उपस्थित संत, भक्त आणि मान्यवरांमध्ये उमटली. या सोहळ्याच्या वेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवत, विविध संत-महंत आणि देशातील तसेच विदेशातील हजारो भाविक उपस्थित होते. राममंदिराच्या या ऐतिहासिक वाटचालीत ९ नोव्हेंबर २०१९ आणि ५ ऑगस्ट २०२० तसेच २२ जानेवारी २०२४ या स्मरणीय तिथींप्रमाणेच २५ नोव्हेंबर हाही दिवस सनातन परंपरेच्या इतिहासात नोंदला गेला. सनातन संस्कृतीतील श्रद्धा, परंपरा आणि अध्यात्मिक सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या धर्मध्वजाचे शिखरावर झालेले आरोहण अयोध्येतील संत समाजासाठी अविस्मरणीय आणि भावनांनी ओथंबलेला क्षण ठरला.

ध्वजारोहणापूर्वी वैदिक मंत्रोच्चारांत व्यापक पूजन-अर्चन पार पडले. यज्ञकुंडांमधून उठणारी आहुतीची सुगंधी धूररेषा, ढोल-नगाऱ्यांचे निनाद आणि “जय श्री राम”च्या गजराने संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारला. निर्धारित शुभमुहूर्तात पंतप्रधानांनी बटण दाबून ध्वजारोहण करता क्षणी मंदिर प्रांगणात जल्लोष उसळला.या कार्यक्रमासाठी सुमारे ७ हजार अतिथींची उपस्थिती होती. त्यात राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अनेक धर्मगुरू, उद्योगक्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, तसेच दलित, वंचित, किन्नर आणि अघोरी समुदायांचे प्रतिनिधीही सहभागी झाले. सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक ठेवण्यात आली होती. संपूर्ण रामनगरी दीप, पुष्प आणि सजावटीने उजळून निघाली होती.

राममंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावरील नाभिदंडावर सोने मढविण्याचे कामही याच काळात पूर्ण झाले आहे. मुंबईतील कारीगरांनी सुमारे २१ किलो सोन्याचे आवरण या दंडावर बसविले. हा नाभिदंड एकूण २११ फूट लांबीचा असून त्याचा पाया सुमारे ५० फूट खोल जमिनीखाली ५ ऑगस्ट २०२० रोजी भूमिपूजनादरम्यान तयार करण्यात आला होता. पश्चिम दिशेने दिसणारा हा सुवर्णमंडित नाभिदंड मंदिराच्या वैभवात महत्त्वाची भर घालतो. अयोध्येने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेणारा महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण अनुभवला असून, राममंदिराच्या या सोहळ्याने श्रद्धा, संस्कृती आणि राष्ट्रीय अभिमान यांचे अद्वितीय संगम साधला आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech