नवी दिल्ली : जस्टिस सूर्यकांत यांनी आज भारताचे ५३ वे मुख्य न्यायाधीश (सीजेआय) म्हणून शपथ घेतली. सीजेआय म्हणून त्यांचा कार्यकाल १५ महिन्यांचा असेल. ते भूषण आर. गवई यांची जागा घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जस्टिस सूर्यकांत यांना सीजेआय पदाची शपथ दिली. सीजेआय भूषण आर. गवई यांनी संविधानाच्या कलम १२४ च्या उपधारा २ अंतर्गत पुढील सरन्यायमूर्ती म्हणून न्या. सूर्यकांत यांचे नाव सुचवले होते. राष्ट्रपतींनी या शिफारशीला मंजुरी देऊन जस्टिस सूर्यकांत यांची देशाचे ५३ वे सीजेआय म्हणून नियुक्ती केली. राष्ट्रपती भवनात आयोजित त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.
जस्टिस सूर्यकांत यांची ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सीजेआय म्हणून नियुक्ती झाली असून ते ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत या पदावर कार्यरत राहतील. प्रत्यक्षात सीजेआय बी. आर. गवई हे ६५ वर्षांचे वय पूर्ण झाल्याने आता निवृत्त होत आहेत. त्यामुळे सीजेआय पदाचा कार्यभार सोडण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील सर्वाधिक वरिष्ठ न्यायाधीशाला पुढील सीजेआय बनवण्याच्या परंपरेनुसार त्यांनी जस्टिस सूर्यकांत यांना आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे.
