वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्यातील तणाव पुन्हा निवळताना दिसत आहे. सध्या दोघे वॉशिंग्टनमध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सन्मानार्थ झालेल्या डिनरमध्ये एकत्र दिसून आले. दोन्ही नेते ६ महिन्यांच्या तणावानंतर एकत्र दिसल्याने चर्चा होत असून हा अमेरिकेच्या राजकारणातील मोठा आणि नवा ट्विस्ट मानला जात आहे. यामुळे राजकारण आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
व्हाइट हाउसमध्ये नुकत्याच झालेल्या डिनरमध्ये ट्रम्प आणि मस्क एकत्र दिसून आले. या डिनर वेळी ट्रम्प यांनी मस्क यांना हसत मजेशीर अंदाजात तीन वेळा हाक मारली. यानंतर त्यांनी म्हटले की, एलॉन तू खूप लकी आहे की मी तुझ्यासोबत आहे! यानंतर ट्रम्प यांनी मस्क यांना असेही म्हटले की, यावर तू मला कधी ‘Thank You’ ही म्हटले नाही. ट्रम्प यांच्या या विधानाने डिनरदरम्यान हशा देखील पिकला.
ट्रम्प यांच्या या विधानानंतर काही तासांना मस्क यांनी सोशल मीडियावर ट्रम्पचे आभार मानणारी पोस्ट केली. मस्क यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अमेरिका आणि जगासाठी केलेल्या कामाचे आभार मानतो. यासोबत मस्क यांनी डिनर दरम्यानचा फोटोही शेअर केला आहे.या डिनरमध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, एनवीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग आणि एलॉन मस्क उपस्थित होते. या डिनरदरम्यान ट्रम्प यांनी नव्या टॅक्स बिलावरही चर्चा केली. हे बिल अमेरिकेतील वाहनांसाठी विशेष सवलती देणार आहे.
जानेवारी ते मे २०२५ दरम्यान एलन मस्क ट्रम्प प्रशासनात ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशिएन्सी’ (DOGE) चे प्रमुख होते. ट्रम्प यांनी तर त्यांना ‘फर्स्ट बडी’ असेही संबोधले होते. परंतु ३० मे रोजी मस्क यांचा स्पेशल गव्हर्नमेंट एम्प्लॉयी कॉन्ट्रॅक्ट संपताच त्यांनी पदाचा राजीनामा दिला.जाता जाता मस्क यांनी ट्रम्प यांच्या ‘बिग ब्यूटीफुल बिल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रचंड सरकारी खर्चाच्या योजनेवर उघडपणे टीका केली होती. त्या वेळी दोघांमधील तणाव स्पष्ट दिसत होता. आता मात्र व्हाइट हाऊस डिनर आणि मस्क यांचे आभार प्रदर्शन हे दाखवत आहे की परिस्थिती पुन्हा सामान्य झाली आहे.
ट्रम्प-मस्कमधील हा अंदाज पाहून अनेकजण आश्चर्यात आहेत. सध्या दोघांची मैत्री पुन्हा ट्रॅकवर येत असल्याचा चर्चांणा उधाण आले आहे. मस्क यांचे परतणे ट्रम्प सरकार आणि रिपब्लिकनपक्षासाठी मोठा ताकद ठरु शकते. २०२६ च्या निवडणुकांमध्ये समीकरणात बदल होऊ शकतो. यामुळे सध्या याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
