bank of maharashtra

बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनी मान्यवरांकडून आदरांजली

0

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनी राज्यभरातून शिवसैनिक आणि नागरिक मुंबईतील शक्तीस्थळाकडे मोठ्या संख्येने जमल्याचे दिसून आले. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या बाळासाहेबांची आठवण आजही महाराष्ट्राच्या मनात ताजी आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून, शिवसेनेच्या विचारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध ठिकाणांहून अनुयायी मुंबईत पोहोचत आहेत. राज्य आणि देशातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनीही सोशल मीडियावरून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले की, राष्ट्रवादी विचारसरणीचे प्रखर ध्वजवाहक आणि सनातन संस्कृतीचे अढळ रक्षक आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक आदरांजली अर्पण करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदनीय शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले की, साहेब, आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणाले की, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला आणि प्रादेशिक अस्मितेला नवी दिशा देणारे, आपल्या व्यंगचित्रांतून आणि प्रभावी वक्तृत्वानं मराठी माणसाच्या मनात न्याय-हक्काच्या लढ्याची भावना जागरूक करणारे, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहले की, “ज्यांच्यामुळे मी घडलो असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना! असा पुरुष सिंह होणे नाही! मराठी माणसाने एकजुटीने राहावे आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे हीच त्यांना आदरांजली”! अशा शब्दांत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

व्यंगचित्रकार ते महाराष्ट्राचे नेते : बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. बाळासाहेबांनी ‘द फ्री प्रेस जर्नल’मधून पत्रकार आणि व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्येही त्यांची व्यंगचित्रं प्रसिद्ध झाली. १९६० मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली आणि ‘मार्मिक’ नावानं स्वतःचं राजकीय मासिक सुरू केलं.

१९६६ मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना : बाळासाहेबांनी १९६६ मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना केली. त्यांची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी १९८९ मध्ये ‘सामना’ हे वृत्तपत्रदेखील सुरू केलं. २०१२ मध्ये त्यांच्या निधनाची बातमी समजताच मुंबईत सर्वत्र ठप्प झाली होती. यावरून त्यांच्या राजकीय उंचीचा अंदाज लावता येतो. त्यांच्या अंत्ययात्रेला लाखो लोकांनी गर्दी केली होती.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech