bank of maharashtra

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये चकमकीत ६ नक्षलवादी ठार

0

बीजापूर : छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आज, मंगळवारी चकमकीत ६ नक्षलवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून इन्सास रायफल, स्टेनगन, ३०३ रायफल आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत बीजापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी सांगितले की, राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात नक्षलवाद्यांनी माहिती मिळाल्यानंतर, डीआरजी बीजापूर, डीआरजी दंतेवाडा आणि एसटीएफ या संयुक्त पथकाला नक्षलविरोधी मोहिमेसाठी रवाना करण्यात आले होते. सकाळी सुमारे १० वाजल्यापासून अधूनमधून गोळीबार सुरू झाला. यात एकूण ६ नक्षलवादी ठार झाले असून त्यांचे मृतदेह गवसले आहेत.

यावर्षी २०२५ मध्ये आतापर्यंत २५९ नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत. त्यापैकी २३० जण बस्तर विभागातील ७ जिल्ह्यात ठार झाले आहेत, तर २७ गरियाबंद जिल्ह्यात आणि २ दुर्ग विभागातील मोहला-मानपूर-अंबागढ चौकी जिल्ह्यात ठार झाले आहेत. दरम्यान बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. म्हणाले की, ही कारवाई सुरक्षा दलांसाठी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक विजय आहे. सध्या माओवादी संघटना नेतृत्वविहीन आणि दिशाहीन अवस्थेत असून, काही उरलेल्या तळांपुरतीच मर्यादित आहे. या मोहिमेत सीआरपीएफ आणि राज्य पोलीस दलाचे अतिरिक्त जवान परिसरात तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून पळून गेलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेता येईल. सुरक्षा कारणास्तव सध्या चकमकीचे ठिकाण आणि सहभागी जवानांची संख्या उघड केली जाणार नाही.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech