bank of maharashtra

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ स्फोट ८ जणांचा मृत्यू

0

परिसरातील वाहने नुकसानग्रस्त, अनेक जखमी

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ आज, सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्फोटाच्या तीव्रतेमुळे आसपासच्या दुकानांचे दरवाजे व खिडक्या फुटल्या असून परिसरातील ७ ते ८ वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. स्फोटाची सूचना मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळाला वेढा घालून तपास सुरू केला असून राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआए) पथक देखील दाखल झाले आहे.

यासंदर्भातील प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये झाला. स्फोटानंतर कारने पेट घेतला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले गेले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेची टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे. घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली असून, ४ ते ५ जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी झालेले नाही. स्फोटानंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

स्फोटानंतर परिसरातील काही दुकानांनाही आग लागल्याचे वृत्त आहे. चांदणी चौकातील भागीरथ पॅलेसपर्यंत कंपन जाणवले आणि व्यापारी एकमेकांना फोन करून परिस्थिती विचारत होते. काही बस आणि इतर वाहनांनाही आग लागल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन विभागाला स्फोटाची माहिती संध्याकाळी मिळाली आणि तात्काळ ६ रुग्णवाहिका व ७ फायर टेंडर घटनास्थळी रवाना करण्यात आले. बचावकार्य सुरू असून, आग पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी परिसर सील केला असून, तपास यंत्रणा घटनास्थळी पुरावे गोळा करत आहेत. प्राथमिक अहवालानुसार, स्फोट कारमध्ये झाला होता, मात्र त्याचे स्वरूप आणि कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

घटनेनंतर लाल किल्ला आणि चांदणी चौक परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. दिल्लीतील संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुग्राममध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. डीसीपी (पश्चिम) यांना कंट्रोल रूमची जबाबदारी देण्यात आली असून, चार हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात आहेत. दिल्ली-गुरुग्राम सीमारेषेवर नाकाबंदी करण्यात आली असून, सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. विशेषतः इतर राज्यांच्या क्रमांकाच्या गाड्यांतील चालक व प्रवाशांच्या ओळखपत्रांची तपासणी केली जात आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech