bank of maharashtra

सर जे. जे. समूह रुग्णालयास राज्य महिला आयोगाची नोटीस

0

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल तक्रारीबाबत विहित मुदतीत अहवाल सादर न केल्याने तसेच सुनावणी दरम्यान आपली भूमिका स्पष्ट न केल्याने आयोगाने अधिष्ठाता, सर जे जे समूह रुग्णालय यांना नोटीस बजावली आहे. सर जे जे समूह रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र विभागातील प्राध्यापिका आणि डॉक्टर महिलेने त्यांच्या विभागप्रमुखाकडून त्यांना होत असलेल्या सततच्या मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे १० जुलै २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने रुग्णालय प्रशासनाकडून दोन वेळा, दिनांक १८ जुलै २०२५ आणि २४ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल मागविला होता. रुग्णालय प्रशासनाने अहवाल सादर न केल्याने याची गंभीर नोंद घेत आयोगाने याप्रकरणी दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोग कार्यालयात सुनावणी घेतली. सुनावणीस रुग्णालय प्रशासनाच्या वतीने उपस्थित व्यक्तीस तक्रार आणि त्यावर रुग्णालयाने केलेली कार्यवाही याबाबत कुठलीही माहिती नव्हती.

महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींना गांभीर्याने न घेणे आणि आयोगाने मागितलेली माहिती वेळेत न देता, सहकार्य न करणे या गंभीर मुद्द्यांची नोंद घेत आयोगाने अधिष्ठाता, सर जे जे समूह रुग्णालय यांना आयोगाने नोटीस बजावली आहे. रुग्णालय आस्थापनेकरिता स्थापित अंतर्गत समिती (IC) कमिटीची संपुर्ण माहिती, तक्रारदार महिलेच्या तक्रारीबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणती दखल घेतली आहे याबाबत सविस्तर अहवाल तसेच ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांना सेवानिवृत्तीनंतर पुन्हा महत्वाच्या जबाबदा-या सोपविल्यामुळे ते पुन्हा अर्जदार डॉक्टर महिलेस मानसिक त्रास देत असल्याची बाब शासनाला अवगत केली का याचा सविस्तर खुलासा सात दिवसांच्या आत आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश अधिष्ठाता, सर जे जे समूह रुग्णालय यांना देण्यात आले आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech