नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशातील १२ राज्यांमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयुक्तांनी सांगितले की, बिहारमध्ये एसआयआरचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, आता दुसऱ्या टप्प्यात अंदमान-निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.या राज्यांमध्ये सुमारे ५१ कोटी मतदार असून, ५ लाख ३३ हजारांहून अधिक मतदान केंद्रे आणि बीएलओ (ब्लॉक लेव्हल ऑफिसर्स) तैनात केले जातील.
ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले की, एसआयआरचे उद्दिष्ट मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे, पात्र मतदारांना समाविष्ट करणे आणि अयोग्य नावे वगळणे हे आहे. प्रत्येक घरात बीएलओ तीन वेळा भेट देऊन माहिती गोळा करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, ज्या राज्यांमध्ये एसआयआरची प्रक्रिया सुरू होणार आहे, तेथे आज मध्यरात्रीपासून मतदार याद्या गोठवल्या जातील. तसेच, इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झालेले मतदार ऑनलाईन अर्जाद्वारे आपली नावे नोंदवू शकतील.
आयोगाच्या मते, एसआयआरची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष असेल. यात नवीन मतदारांचा समावेश करून लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्याचा उद्देश आहे.देशातील आसाम, तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने, या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. मात्र, ज्या ठिकाणी सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, तेथे ही प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात येईल.भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत अलीकडेच बैठक घेऊन या मोहिमेची तयारी पूर्ण केली आहे.
