नवी दिल्ली : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.प्रसिद्ध अभिनेता आणि गायक ऋषभ टंडन याचे आज सकाळी दिल्लीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो ३५ वर्षांचा होता. ऋषभ टंडन हा ‘फकीर’ या नावाने चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होता. त्याच्या अचानक झालेल्या निधनाने भारतीय संगीत आणि चित्रपट क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ऋषभ याच्या एका निकटवर्तीय मित्राने सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ऋषभ मुंबईहून दीपावली साजरी करण्यासाठी आपल्या कुटुंबासह दिल्लीला आला होता. तिथेच त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी प्रयत्न केले, परंतु त्याला वाचवता आले नाही.
ऋषभ टंडन याच्या अकाली निधनाने सहकारी आणि चाहत्यांकडूव शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर चाहते त्याचे जुने व्हिडिओ, गाणी आणि आठवणी शेअर करत आहेत. अनेकांनी त्याला ‘आवाजाचा फकीर’ असे संबोधत श्रद्धांजली अर्पण केली आहे. ऋषभ टंडन याच्या गाण्यांमध्ये सदैव भक्ति, अध्यात्म आणि आत्मिक शांततेचा स्पर्श आढळायचा. त्याचे सर्वाधिक लोकप्रिय गाणे ‘शिव तांडव स्तोत्रम्’ हे होते, ज्यामुळे त्याला देशभरात नवी ओळख मिळाली. या गाण्याला सोशल मीडियावर आणि म्युझिक प्लॅटफॉर्मवर कोट्यवधींचे व्ह्यूज मिळाले. त्याच्या इतर लोकप्रिय गाण्यांमध्ये ‘धू धू करके’, ‘फकीर की जुबानी’ आणि ‘ये आशिकी’ यांचा समावेश आहे. त्याचा आवाज गहिरा, भावपूर्ण आणि आत्मीयतेने ओतप्रोत होता, जो त्याला समकालीन गायकांपासून वेगळं स्थान देत होता.
भगवान शिवांचे परम भक्त – ऋषभ टंडन हा केवळ एक कलाकार नव्हता, तर भगवान शिव यांचा परम भक्त होता. तो अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये आणि सोशल मीडियावर सांगायचा की, “माझ्या गाण्यांमधील शांती ही महादेवाची कृपा आहे.” त्याच्या संगीतामध्ये शिवभक्तीची झलक स्पष्ट दिसत असे. ‘फकीर’ या नावाने लोकप्रिय झालेल्या ऋषभ याचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्याचे लाइव्ह सत्र आणि आध्यात्मिक संगीताचे व्हिडिओ पाहण्यासाठी चाहते आतुर असायचे. तो जीवन, प्रेम आणि अध्यात्मावर आधारित विचार सोशल मीडियावर मांडत असत. ज्यामुळे तो विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय झाला होता. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.