नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या निमित्ताने देशवासियांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरून देशातील जनतेला भारतीय वस्तू खरेदी करण्यास सांगितले असून असेही म्हटले आहे की, खरेदी केल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करा. असे केल्याने तुम्ही इतरांनाही देशी वस्तू खरेदी करण्यासाठी प्रेरित कराल.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये लिहिले,“चला, या सणाच्या हंगामात १४० कोटी भारतीयांचे परिश्रम, सर्जनशीलता आणि नवोपक्रमांचा उत्सव साजरा करूया. चला, भारतीय उत्पादने खरेदी करूया आणि अभिमानाने म्हणूया – हे स्वदेशी आहे! तुम्ही जे काही खरेदी केले आहे, ते सोशल मीडियावर शेअर करा. यामुळे इतरांनाही असे करण्यासाठी प्रेरणा मिळेल.”
पंतप्रधान मोदी यांनी ‘माय गव्हर्नमेंट इंडिया’ या अधिकृत खात्याचा एक पोस्ट शेअर करत स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते. हे खाते देशवासीयांना सरकारशी जोडण्याचे काम करते आणि सरकारी धोरणे सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवते. माय गव्हर्नमेंट इंडिया च्या पोस्टमध्ये लिहिले होते, “आपण सर्वजण स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहोत! या दिवाळीत, चला फक्त स्वदेशी उत्पादने खरेदी करूया आणि स्थानिक कारागिरांना पाठिंबा देण्याचा संकल्प करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला ‘वोकल फॉर लोकल’साठी प्रेरित करत आहेत. तुम्ही जे स्वदेशी उत्पादन खरेदी केले आहे किंवा त्याचे उत्पादक यांच्यासोबतची सेल्फी सोशल मीडियावर शेअर करा.”
दिवाळी निमित्त दुबईसह ऑस्ट्रेलिया, सिंगापूरच्या पंतप्रधानांनी भारतीयांना दिल्या शुभेच्छा
आज संपूर्ण भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशा वेळी देश-विदेशातील प्रसिद्ध नेतेही भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दुबईचे शेख, ऑस्ट्रेलिया, सिंगापूरचे पंतप्रधान यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हटलं, “प्रकाशाच्या या महान सणासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहात. माझी प्रार्थना आहे की, भगवान तुमच्या उज्ज्वल भविष्यातही आशा आणि प्रकाश भरून टाको. हा सण तुम्हा सर्वांसाठी अत्यंत खास ठरो.”
संयुक्त अरब अमिरातीचे (युएइ) पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा देत म्हटलं:“ युएइसह जगभरात दिवाळी साजरी करणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रकाशाचा हा सण सर्वांसाठी शांती, सुरक्षा आणि समृद्धी घेऊन येवो.” सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हटलं, “अंधारावर प्रकाशाचा विजय दिवाळीची उलटी गिनती सुरू असताना, आपण केवळ आपली घरं नव्हे तर आपली मनंही प्रकाशाने उजळवणार आहोत. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.” या शुभेच्छा संदेशांमधून विविध देशांच्या नेत्यांनी भारतीय सणांचं महत्त्व मान्य करत आपुलकी व्यक्त केली आहे.