उत्तर भारतीय आणि बिहाऱ्यांवर हल्ले करणारी मनसे आता महाविकास आघाडीचा (MVA) भाग — मग काँग्रेस बिहारमध्ये कोणत्या तोंडाने मते मागणार?
मुंबई : शिवसेना (शिंदे गट) चे उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी काँग्रेसवर दुटप्पी वागणुकीचा आरोप करत म्हटले की, काँग्रेसने आता स्पष्ट करावे की मुंबईतील उत्तर भारतीयांविरुद्ध द्वेषाची भूमिका घेणारी मनसे महाविकास आघाडीचा भाग आहे का नाही? गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम म्हणाले की, मतदार याद्यांतील त्रुटींवर निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस यूबीटीसोबत मनसेचा सहभाग दिसून आला. यावरून हे स्पष्ट होते की राज ठाकरे यांची मागील दरवाजातून एमव्हीएमध्ये एन्ट्री झाली आहे.
निरुपम म्हणाले, “महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेसोबत हातमिळवणी करणारी काँग्रेस आता बिहार विधानसभा निवडणुकीत कोणत्या तोंडाने मते मागणार?” ते पुढे म्हणाले, “मनसेने मुंबईतील आस्थेचा सण छठपूजा याला ‘ड्रामा’ म्हटले होते. मग काँग्रेस मनसेसोबत हात मिळवून बिहारमध्ये जाऊन छठपूजेचा विरोध करणार आहे का?” निरुपम यांनी असा दावा केला की काँग्रेसच्या उच्च नेतृत्वाने आतल्या गोटात ठरवले आहे की, बिहार निवडणुका होईपर्यंत मनसेला अधिकृतपणे एमव्हीएमध्ये सामील करण्याची घोषणा केली जाणार नाही. हे बिहारच्या लोकांविरोधात मोठे षड्यंत्र आहे. ते म्हणाले, “जर काँग्रेस खरोखरच बिहारी मतदारांच्या भावना आणि परंपरांचा आदर करत असेल, तर तिने मनसेबाबत आपली भूमिका उघडपणे स्पष्ट करावी.”
निरुपम यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या मुद्यावर निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात उभाठा प्रमुखांसोबत मनसे प्रमुख, राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रमुख आणि काँग्रेसतर्फे अध्यक्षाऐवजी बालासाहेब थोरात उपस्थित होते. यावरून हे स्पष्ट होते की काँग्रेस आणि एमव्हीएने मनसेला मागच्या दरवाजातून प्रवेश दिला आहे. निरुपम म्हणाले, “राज्य काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले स्वतः त्या शिष्टमंडळात न जाता थोरातांना पाठवून आपले दुटप्पीपण दाखवत आहेत. पटोले झूठ बोलत आहेत. ते आपल्या मुलांच्या नावाने शपथ घेऊन सांगू शकतील का की बिहार निवडणुकीनंतर मनसेला एमव्हीएमध्ये सामील केले जाणार नाही?”ते पुढे म्हणाले, “ठाणे आणि मुंबईतील उत्तर भारतीय टॅक्सीचालक, फेरीवाले यांच्यावर हल्ले करणाऱ्या मनसेला मागच्या दरवाजातून एमव्हीएमध्ये आणणाऱ्या काँग्रेसला मुंबई महापालिका निवडणुकीत जनता धडा शिकवेल.”
‘राज आणि उद्धव मजबूर आहेत’
निरुपम यांनी सवाल केला की, “मनसे एवढी असहाय्य झाली आहे का की आपल्या दीपोत्सव कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करावे लागले?” ते म्हणाले, “विपक्ष मतदार याद्यांचा मुद्दा पुढे करून स्थानिक स्वराज्य निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, कारण त्यांना आपल्या पराभवाची खात्री झाली आहे. राज आणि उद्धव दोघेही मजबूर आहेत.” निरुपम म्हणाले, “आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिवसरात्र काम करत आहेत. जनतेशी थेट संपर्कात आहेत. राज्य सरकारने जनहिताच्या योजना जमिनीवर उतरवल्या आहेत. त्यामुळेच शिंदे साहेब म्हणतात की एमव्हीए म्हणजे महा फस्ट्रेशन आणि कन्फ्यूजन आघाडी आहे.”
ते पुढे म्हणाले, “फक्त राजकीय फायद्यासाठी मनसे आणि उभाठा गटाचे लोक मराठी मुद्द्याचा वापर करतात. निवडणुका आल्या की उत्तर भारतीयांवर हल्ल्यांचे राजकारण सुरू करतात. मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना नाकारले — उभाठा गटाकडे फक्त २० आमदार राहिले, तर मनसेचे मत प्रमाण केवळ १.५ टक्के राहिले.”
“बीईएसटीच्या क्रेडिट सोसायटी निवडणुकीतही मराठी मतदारांनी उभाठा आणि मनसेला त्यांची जागा दाखवून दिली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा त्याग केला, त्यामुळे मराठी समाजाचा मोठा वर्ग त्यांच्यावर नाराज आहे. मनसेच्या हिंसक कारवायांमुळे मुंबईतील शांतता भंग होते, त्यामुळे समाजातील कोणताही घटक त्यांच्याकडे जाणार नाही. कोणतेही ध्रुवीकरण होणार नाही.”
निरुपम म्हणाले, “मनसेसोबत हातमिळवणी करून काँग्रेसने आपला खरा चेहरा उघड केला आहे. बिहारमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उच्च नेतृत्वाविरोधात बंड पुकारले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून विरोधाचे व्हिडिओ समोर येत आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वे परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना मनसेने मारहाण केली होती, आणि आज काँग्रेस त्यांच्यासोबत आहे — हे लज्जास्पद आहे. याचे परिणाम काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीतच नव्हे तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांतही भोगावे लागतील.”