bank of maharashtra

भारतासाठी पूर्वोत्तरमधील आठही राज्ये महत्त्वपूर्ण – गडकरी

0

नागपूर : भारतासाठी पूर्वोत्तरमधील आठही राज्ये महत्त्वपूर्ण असून त्यांची भाषा, संस्कृती निराळी असली, ‘भाषा अनेक फिर भी हमारा देश एक’ या न्यायाने एकतेचा संदेश पूर्वोत्तरवासीयांनी दिला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय ‘नॉर्थ इस्ट ऑक्टेव्ह’ महोत्सवाचा रविवारी समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते.

समारोपीय कार्यक्रमाला, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहायक संचालक दुर्गेश चांदवानी, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक डॉ. आस्था कार्लेकर, सहायक संचालक दीपक कुळकर्णी उपस्थित होते. समारोपप्रसंगी उपस्थित कलावंत आणि नागरिक यांच्याशी संवाद साधताना नितीन गडकरी यांनी पूर्वोत्तरचे हातमाग, हस्तकारागिरी, बांबू वर्कच्या वस्तू संपूर्ण देशात लोकप्रिय आहेत, असे सांगितले. माझ्या मंत्रीपदाच्या काळात आसाम आणि इतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये ३ लाख कोटी रुपयांची रस्ते विकासकामे झाली. यासोबतच काझीरंगा ते नुमालीगड दरम्यान एलेव्हेटेड हाय-वे तयार होत आहे. तसेच, ब्रह्मपुत्र नदीवर पूर्वी दोनच पूल होते, आता त्यांची संख्या ९ झाली असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी संपूर्ण महोत्सवाचे कोरिओग्राफर तरुण प्रधान व बांबू शिल्प कलावंत मुकेश सायकिया यांचा गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.समारोप सत्राचा शुभारंभ मणिपूरच्या पुंग ढोल चोलम या पारंपरिक नृत्याने करण्यात आला. सामान्यतः होळी सणानिमित्त मणिपूरमध्ये हा नृत्यप्रकार लोकप्रिय आहे. आज या नृत्यासोबत मार्शल आर्ट आणि थांम टा या युद्धकौशल्याचे प्रात्यक्षिक रसिकांना अनुभवता आले. यानंतर सतरीया डान्स हा आसामचा पारंपरिक नृत्य प्रकार सादर करण्यात आला. त्यात श्रीकृष्णाच्या लीलांचे संगीतासह काव्यमय व पदलालित्यसह कलावंतांनी सुरेख सादरीकरण केले व रसिकांची दाद मिळविली. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात नॉर्थ-ईस्ट रॉक बँड चमूने विविध देशभक्तिपर गीतांचे वादन व गायन एकत्रितरीत्या समर्थपणे सादर केले. त्याचा प्रारंभ ए. आर. रहमान यांच्या लोकप्रिय वंदे मातरमने करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विवेक अलोणी आणि मोहिता दीक्षित यांनी केले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech