bank of maharashtra

” प्रवासी व चालकांना ” केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी व्यवसाय करावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी साठी ॲग्रिगेटर धोरण नियमावली येत्या २ दिवसात जाहीर होत असुन त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना ” प्रवासी व चालकांना ” केंद्रस्थानी ठेवावे, भरमसाठ नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची आर्थिक लुबाडणूक करून व्यवसाय वृद्धी करु नये, असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते मंत्रालयात इंडियन फेडरेशन ऑफ ॲप -बेस ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या (IFAT) बैठकीत बोलत होते. या बैठकीला परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) किरण होळकर यांच्या सह IFAT चे अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या संदर्भात अनेक तक्रारी प्रवासी व चालकांच्या कडून आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी काही संस्था नफेखोरीच्या नादात प्रवासी व चालकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. त्यासाठी निश्चित नियमावली तयार करून वाजवी भाडे आकारणे तसेच चालकांना मिळणार उत्पन्नातील ८० टक्के परतावा देणे अशा महत्त्वाच्या सुधारणांचा समावेश असलेले ॲग्रीगेटेड धोरण येत्या दोन दिवसात जाहीर होत आहे. या धोरणामुळे ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी चालवणाऱ्या संस्थांच्या वर शासनाचा अंकुश राहील. त्यामुळे प्रवाशांना आणि या संस्थेकडे काम करणाऱ्या चालकांना न्याय मिळेल.

राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याच्या हेतूने ॲग्रीगेटेड धोरणाच्या माध्यमातून ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा एकाच नियमावलीच्या छताखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या व्यवसायाला निश्चित अशी दिशा प्राप्त होईल. त्यातून प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याबरोबरच चालकांच्या हक्काचे व अधिकाराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech