bank of maharashtra

सणासुदीचा काळ स्वदेशी गोष्टींनी साजरा करण्याचा संकल्प करा! – पंतप्रधान

0

सण-उत्सवांमुळे भारताची संस्कृती जिवंत!

नवी दिल्ली : आगामी सणासुदीचा काळ स्वदेशी गोष्टींचा वापर करून साजरा करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या १२६ व्या भागात त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. सण-उत्सवांनी भारताची संस्कृती जिवंत ठेवली आहे. या अनुषंगानंच आज जागतिक सण बनलेल्या छठ पूजेच्या महापर्वाचा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समावेश व्हावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

सण-उत्सवांच्या निमित्ताने आपण करत असलेली स्वच्छता घरापुरती मर्यादित राहू नये, तर संपूर्ण परिसराची स्वच्छता देखील आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने त्यांनी दिवाळीसाठी शुभेच्छाही दिल्या. आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे आणि या ध्येयाचा मार्ग स्वदेशीतूनच पुढे जातो असं ते म्हणाले. जीएसटी सुधारणांमुळे बचत उत्सव साजरा होत असताना व्होकल फॉर लोकल हा आपल्या सर्वांचा खरेदीचा एक मंत्र बनला पाहिजे, या संकल्पामुळे आपल्या सणांची रंगत अनेक पटीनं वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवरात्रौत्सवाचं औचित्य साधून प्रधानमंत्र्यांनी देशाच्या महिला शक्तीच्या सामर्थ्याचा गौरव केला. आज व्यवसाय, क्रीडा, शिक्षण ते विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात भारताच्या महिलांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे, त्या आपण कल्पनाही करू शकत नाही अशा कठीण आव्हानांवर मात करत आहेत असं ते म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी नौदलाच्या दीर्घ सागरी सफरीत सहभागी झालेल्या लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रुपा यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या आव्हानात्मक सफरीचे अनुभव ऐकण्याची संधी श्रोत्यांना दिली.

आजच्या दिवशीच हुतात्मा भगतसिंग आणि महान गायिका लता मंगेशकर यांची जयंती असल्याचं स्मरण करून देत त्यांनी या दोघांनाही अभिवादन केलं, आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला. भगतसिंगाचं व्यक्तीमत्व प्रत्येक भारतवासीयासाठी, विशेषतः देशातल्या युवा वर्गासाठी प्रेरणादायी आहे. लता मंगेशकर यांच्या गाण्यांमध्ये मानवी संवेदनांना सचेत करण्याची ताकद होती, असं सांगून त्यांनी लता दिदींसोबतच्या आपल्या स्नेहपूर्ण नात्यालाही उजाळा दिला.

येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती साजरी करताना खादीचं कोणतंही उत्पादन खरेदी करून, अभिमानानं ते व्होकल फॉर लोकल या हॅशटॅगसोबत समाजमाध्यमांवर सामायिक करावं असं आवाहन त्यांनी केलं. परंपरा आणि नवोन्मेषाच्या मिलाफातून देशभरात हातमाग क्षेत्रात सुरु असलेल्या अभिनव प्रयोगांच्या यशोगाथा आणि त्यातून निर्माण झालेल्या रोजगारांची माहिती त्यांनी दिली. या यशोगाथांमधून आपल्या परंपरांमध्ये उत्पन्नाची असंख्य साधनं दडलेली असल्याची प्रचिती येते असं ते म्हणाले.

राष्ट्रासाठी समर्पण, त्याग, सेवा हीच भावना आणि शिस्त ही संघाची ताकद!
यंदाच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख करुन त्यांनी संघाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा गौरव केला. देशाला वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या उद्देशानं डॉ. हेडगेवार यांनी ही संघटना स्थापन केली त्यानंतर गोळवलकर गुरुजी यांनी संघ स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रासाठी समर्पण भावना जागृत केली, त्याग आणि सेवेचा मार्ग दाखवला. हीच भावना आणि शिस्त ही संघाची ताकद आहे, राष्ट्र प्रथम या भावनेने संघ कार्यकर्ते काम करतात, कुठेही आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे स्वयंसेवक तिथे पहिल्यांदा पोहचतात असं ते म्हणत त्यांनी या स्वयंसेवकांना शुभेच्छाही दिल्या.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech