नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशिया कप २०२५ चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. बिहारमधील राजगीर येथे रविवारी (दि.७) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाला ४-१ ने पराभूत केले. ८ वर्षांच्या अंतरानंतर भारतीय संघाने पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या विजयामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आनंदित झाले असून त्यांनी भारताच्या या विजयाला अत्यंत खास असे संबोधले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “बिहारच्या राजगीरमध्ये आयोजित आशिया कप २०२५ मध्ये शानदार विजयानंतर आपल्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. ही विजय आणखी खास आहे कारण त्यांनी गतविजेता दक्षिण कोरियाचा पराभव केला आहे. हा क्षण भारतीय हॉकी आणि भारतीय क्रीडाजगतातील अभिमानाचा आहे. आपले खेळाडू अशीच नवी उंची गाठोत आणि देशाला अधिक गौरव मिळवून देत राहोत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशिया कप हॉकी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल बिहार सरकार आणि जनतेचेही अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले, “मी बिहार सरकार आणि जनतेचेही कौतुक करू इच्छितो, ज्यांच्या प्रयत्नांमुळे राजगीरने एका शानदार स्पर्धेचे यजमानपद भूषवले आणि हे शहर एक सजीव क्रीडा केंद्र बनले आहे.” पुरुष हॉकी आशिया कप २०२५ चे आयोजन यंदा बिहारच्या राजगीर जिल्ह्यातील राज्य क्रीडा अकादमी सह बिहार क्रीडा विद्यापीठ परिसरात करण्यात आले होते. ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान पार पडली, ज्यामध्ये भारत, चीन, जपान, चीनी तैपेई, मलेशिया, दक्षिण कोरिया, ओमान आणि बांगलादेश या आघाडीच्या हॉकी संघांनी सहभाग घेतला.