bank of maharashtra

अयोध्येतील राम मंदिर रविवारी दुपारनंतर राहणार बंद

0

अयोध्या : आगामी ७ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध सुरू होत असल्याने रविवारी दुपारनंतर रामजन्मभूमी मार्गावरून भाविकांचा प्रवेश बंद केला जाईल आणि मंदिराची दारे बंद ठेवली जातील. श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ७सप्टेंबर रोजीच्या चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर दुपारनंतरचे चारही दर्शन स्लॉट्स आणि रात्री होणारी शयन आरती रद्द केल्याचे जाहीर केले आहे. चंद्रग्रहण रात्री सुमारे १० वाजता लागणार असले तरी ग्रहणाचे वेध दुपारी १२.५७ वाजेपासून सुरू होतील. हे ग्रहण मध्यरात्रीपर्यंत राहणार असल्यामुळे रामललांची शयन आरती देखील होणार नाही. दुसऱ्या दिवशी सोमवारी ८सप्टेंबर रोजी सकाळपासून रामललांचे नियमित पूजन व दर्शन पुन्हा सुरू होईल. सकाळी ६.३० वाजेपासून मंदिर दर्शनासाठी खुले राहील. चंद्रग्रहण व सूर्यग्रहणाच्या वेळी मंदिरांतील देवतांची पूजा व आरती न करण्याची परंपरा आहे. ग्रहणाचा वेध काळ सुरू होताच मंदिर बंद केले जातात, ही परंपरा अयोध्येतील विविध मंदिरांमध्ये शतकानुशतके पाळली जाते.

आगामी ७ सप्टेंबरचे ग्रहण देशभरातून दिसणार असल्याने राम मंदिर ट्रस्टने देखील ही परंपरा पाळून सूतक काळापासून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महासचिव चंपतराय यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे.मंदिर व्यवस्थापक गोपाल राव यांनी सांगितले की ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेपासून डी-वन पॉइंट (रामजन्मभूमी पथ) वरून भाविकांचा प्रवेश बंद केला जाईल. मंदिराचे दरवाजे ८ सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा उघडले जातील व दर्शन सुरू होईल. मंदिर बंद राहिल्यामुळे दर्शन स्लॉटचे सर्व पास रद्द करण्यात आले आहेत. यासंदर्भात महंत आचार्य मिथिलेशनंदिनीशरण यांनी सांगितले की, चंद्र ग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर येणाऱ्या चंद्रकिरणांवर राहु-केतु यांचा प्रभाव पडतो. त्यामुळे त्या किरणांची छाया प्रत्येक मनुष्यावर पडते, आणि त्यामुळे व्यक्ती अपवित्र मानली जाते. अशा स्थितीत पूजा-पाठ करण्यास तो अयोग्य ठरतो.चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी व सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी ग्रहणाचे वेध सुरू होतात. या दरम्यान मंदिरांमध्ये पूजन, पाठ व आरती करण्यास मनाई असते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech