चंदीगड : पंजाबमधील गंभीर पूर परिस्थितीमध्ये, चित्रपट आणि संगीत उद्योगातील कलाकारांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. बाधित जिल्ह्यांतील हजारो कुटुंबे घरे आणि पिकांच्या नुकसानीशी झुंजत आहेत. अशा कठीण काळात, सेलिब्रिटींनी मदत कार्यात सक्रियपणे सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदपासून रणदीप हुड्डा आणि दिलजीत दोसांझ यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला असून लोकांना या कठीण काळात धैर्य ठेवण्याचे सांगितले आहे. त्यांनी संपूर्ण देशवासियांना या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या पंजाबवासीयांना मदत करण्याचेही आवाहन केले आहे.
अभिनेता सोनू सूद यांनी सांगितले, “आम्ही पंजाबमधील काही पुरग्रस्त भागांमध्ये पोहोचलो आहोत आणि उर्वरित भागांमध्ये पोहोचण्यासाठी काम करत आहोत. ही केवळ मदत नाही, हे तुमच्यासोबत कायम उभं राहण्याचं आमचं वचन आहे. मी पंजाबसोबत आहे. या विनाशकारी पुरामुळे प्रभावित झालेला एकही व्यक्ती एकटा नाही. आपण सगळे मिळून प्रत्येक व्यक्तीला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करू.तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास, कुठलाही संकोच न करता आम्हाला संदेश पाठवा. आम्ही शक्य त्या सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करू.पंजाब माझं आत्मा आहे. त्यासाठी सगळं काही गमावलं गेलं तरी मी मागे हटणार नाही. आपण पंजाबी आहोत, आणि आपण हार मानत नाही.”
तर गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझची टीम सतत बाधित भागात पोहोचत आहेत आणि लोकांना अन्न आणि औषधे पुरवत आहेत. इतकेच नाही तर दिलजीत दोसांझ यांनी १० गावे दत्तक घेण्याबद्दलही बोलले आहे. आज प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ते पंजाबचे आहेत आणि त्यांना येथेच मरायचे आहे. पंजाबची सेवा केवळ रेशन पोहोचवण्यापुरती मर्यादित राहणार नाही. जोपर्यंत पंजाब उभा राहत नाही तोपर्यंत ही सेवा सुरूच राहील. याशिवाय दिलजीतने एक भावनिक संदेश शेअर करत पुरग्रस्तांसाठी समर्थन आणि प्रार्थना व्यक्त केल्या आणि आश्वासन दिलं की जोपर्यंत सर्व काही पूर्ववत होत नाही, तोपर्यंत ते त्यांच्या सोबत उभे राहतील.
पंजाबमध्ये आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या लोकांची मदत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा देखील पुढे आले आहेत. त्यांनी पुरग्रस्त भागांना भेट दिली, लोकांशी संवाद साधला आणि त्यांना आवश्यक वस्तू दिल्या. हुड्डा यांनी यापूर्वी आपत्तींमध्ये लोकांना मदत करण्यात सक्रिय भूमिका बजावली आहे आणि यावेळीही ते मदत साहित्य वाटण्यात स्वतः उपस्थित आहेत. त्यांनी सांगितले – “तुम्हाला जे काही लागेल, आम्ही तुमच्यासोबत आहोत.” याशिवाय लोकप्रिय गायिका सुनंदा शर्मा देखील मदत कार्यात मदत करत आहेत. त्या स्वतः गावोगावी जाऊन गरजूंना मदत साहित्य पोहोचवत आहेत आणि सोशल मीडियावर लोकांना मदत कार्यात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन करत आहेत.