वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे इंडस्ट्रीतील मोठमोठ्या नावांची एक बैठक बोलावण्यात आली होती, पण सर्वांत खास मित्राचे शत्रू बनलेले एलोन मस्क यांना निमंत्रणच देण्यात आले नाही. ट्रम्प यांनी गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी या बैठकीत टेक कंपन्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर झालेल्या संशोधन आणि विविध कंपन्यांकडून अमेरिकेत होत असलेल्या गुंतवणुकीबाबत सादरीकरण केले.
मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प एका लांब टेबलच्या मध्यभागी बसले होते आणि त्यांनी म्हटले, “हे आपल्या देशाला एका नव्या स्तरावर घेऊन जात आहे.” त्यांनी या बैठकीत उपस्थित लोकांना “हाय आयक्यू असलेले लोक” असे संबोधले. टेक कंपन्यांच्या या कार्यकारी अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांची प्रशंसा केली आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीबाबत त्यांच्या आशा-अपेक्षा व्यक्त केल्या.
जेव्हा टेक इंडस्ट्रीतील सगळे मोठे चेहरे या बैठकीत उपस्थित होते, तेव्हा ट्रम्प यांच्या गेस्ट लिस्टमधून एलोन मस्क यांची अनुपस्थिती उठून दिसत होती. त्यामागे कारण असे होते की एलोन मस्क कधीकाळी ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते, ज्यांना सरकारच्या जास्त खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विभाग डॉज चे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली गेली होती. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीलाच मस्क आणि ट्रम्प यांच्यात सार्वजनिकरित्या वादावादी झाली होती.
एलोन मस्क यांनी एक्सवर एका उत्तरात दावा केला की, “मला आमंत्रण पाठवण्यात आले होते, पण दुर्दैवाने मी उपस्थित राहू शकलो नाही. माझा एक प्रतिनिधी तिथे असेल.” मात्र,मीडिया रिपोर्टनुसार मस्क यांचे नाव या कार्यक्रमाच्या आमंत्रण यादीत नव्हतेच. ट्रम्प यांनी एलोन मस्क यांना आमंत्रित न केल्याचे जरी स्पष्ट झाले, तरी त्यांच्या जागी आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात मस्क यांचे प्रतिस्पर्धी असलेले ओपनएआय चे सॅम ऑल्टमन मात्र या मीटिंग टेबलवर उपस्थित होते.